नेसरी : राज्यातील अनेक गावांत एस.टी.बस न पोहोचल्यामुळे तेथील नागरिक व विद्यार्थ्यांचे हाल आपणास पाहावयास मिळतात. अशीच हालअपेष्टा सोसत असणाऱ्या कोळिंद्रे व पोश्रातवाडी गावच्या अनेक पिढ्यांनी पायपीट करीतच दिवस काढले. मात्र, आज, मंगळवारचा दिवस या दोन गावांच्या दृष्टीने ऐतिहासिक ठरला. कित्येक दिवसांच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश आले. आजरा आगाराच्या एस.टी. बसने या दोन्ही गावांत प्रवेश केला अन् ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘लोकमत’ने काल, सोमवारी ‘शिक्षणासाठी १२५ विद्यार्थ्यांची होतेय पायपीट’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून विद्यार्थी व ग्रामस्थांची व्यथा, वेदना व चीड मांडली होती. या बातमीची तत्काळ दखल घेत राज्य परिवहन महामंडळाने या मार्गावर काल तत्काळ फेऱ्यांचे नियोजन करण्याचे आजरा आगाराला कळविले होते. त्यानुसार काल प्रथमच या गावात एस.टी.बस सुरू करून परिवहन खात्याने विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व बुजुर्गांचा आशीर्वाद घेतला.आज गावात एस.टी.बस येणार म्हणून या दोन्ही गावांतील ग्रामस्थ, विद्यार्थी, सरपंच व सदस्य स्वागतासाठी उभे होते. या मार्गावर रांगोळी काढल्या होत्या व रस्ते सजविले होते. कोळिंद्रे येथे सकाळी दहा वाजता बस आली. लागलीच तिला ऊस बांधले, पूजा केली व वाहक-चालक यांचा यथोचित सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. तशीच एस.टी. पोश्रातवाडीत आली. गावात एस.टी. येताच फटाकड्या लावून मोठ्या उत्साहाने स्वागत केले. येथेही पुन्हा गाडीची पूजा केली. हार घातले. ग्रामस्थांच्यावतीने पोश्रातवाडीतही वाहक-चालकांचा पुन्हा सत्कार झाला.यावेळी सरपंच सुरेखा पाटील, कस्तुरी बुगडे, रेखा जाधव, शंकर बुगडे, सुरेश बुगडे, सुरेश सावंत, महादेव सुतार, परशराम पाटील, महादेव जाधव, प्राचार्य बी. एम. राजाराम, पोलीसपाटील युवराज देसाई, आनंदा पाटील, धाकोजी खंडागळे, शरद उंडगे, केशव देसाई, आदी उपस्थित होते.‘लोकमत’चे अभिनंदन..!विविध सामाजिक प्रश्नांवर नेहमी आवाज उठविणाऱ्या ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून यावर प्रकाशझोत टाकला होता. याची चर्चा आज होती. तत्काळ बस सुरू झाल्याने ‘लोकमत’चे अभिनंदन करण्यात आले.आजच्या पहिल्या एस.टी. बसचे (एमएच १२ ईएफ ६२३८) चालक अरुण गणपती बेलेकर व वाहक संग्राम गणपती सरदेसाई.आज गावात प्रथमच एस.टी. पोहोचून विद्यार्थी व नागरिकांची सोय झाल्याने दोन्ही गावांतील मंडळी, विद्यार्थी, गावपुढारी अगदी खुशीत होते. एस.टी.ची पूजा करून पेढे वाटले.ही बस कायमस्वरूपी सुरू राहावी यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे सांगून, परिवहन महामंडळाचे गावकऱ्यांनी आभार मानले.
एस.टी. सेवेने अखेर विद्यार्थ्यांची पायपीट थांबली
By admin | Published: December 24, 2014 9:40 PM