कोल्हापूर : एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेला संप मिटला. त्यामुळे सर्वत्र एसटी बसेस ग्रामीण भागातील रस्त्यावर पुन्हा जोमाने धावू लागली आहे. कोल्हापूर विभागाचा विचार करता ७०० बसेसपैकी ५०० बसेस धावू लागल्या. तर उर्वरित २०० बसेस टप्प्याटप्प्याने आज, शनिवारपासून रस्त्यावर धावणार आहेत. काही बसेसना बॅटरीचा, तर काहींना किरकोळ दुरुस्ती, देखभालाची गरज आहे.
कोल्हापूर विभागात एकूण १२ आगार आहेत. या १२ आगारांमध्ये कोल्हापुरातील कार्यशाळेतून मागणीप्रमाणे बसेस पाठविल्या जातात. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सण, यात्रा, उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी यांचे नियोजन केले जाते. कोल्हापूर विभागात एकूण ७०० बसेस आहेत. त्यापैकी ५०० बसेस रस्त्यावर उतरल्या आहेत. तर अन्य २०० बसेस मागणीप्रमाणे ज्या त्या आगारांमध्ये सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर विभागातील बारा आगारांमार्फत गेल्या चार दिवसांपासून ५०० बसेस कार्यरत आहेत. या बसेसद्वारे दिवसाकाठी १,५०० हून अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. तर टप्प्याटप्प्याने आणखी २०० बसेसही सेवेत दाखल केल्या जाणार आहेत. त्यामुळे फेऱ्यांमध्ये आणखी वाढ होणार आहे. शंभरहून अधिक बसेस नादुरुस्त आहेत.
१,२०० कर्मचारी कामावर हजर
कोल्हापूर विभागातील बारा आगारांमधील ४,२६७ पैकी निम्मे कर्मचारी संपावर ठाम होते. काही कर्मचारी टप्प्याटप्याने कामावर परतले. तर उर्वरित १,२०० हून अधिक कर्मचारी न्यायालयीन निर्णयानंतर कामावर परतले. विभागातील कर्मचाऱ्यांची एकूण संख्या ४,२६७ इतकी होती. आज, शुक्रवारअखेर कामावर सर्व कर्मचारी पुन्हा रुजू झाले आहेत. त्यामुळे आज, शनिवारपासून जिल्ह्यातील खेडापाड्यापर्यंत पुन्हा लालपरी पोहोचणार आहे.
कर्मचारी संख्या अशी
- प्रशासकीय कर्मचारी - ५५१
- कार्यशाळा कर्मचारी - ८९७
- चालक - १,३२६
- चालक तथा वाहक - २९
- वाहक - १,४७४
- एकूण - ४,२६७
कोल्हापूर विभागातील बसेस संख्या अशी
- बारा आगारांकरिता एकूण बसेस - ८००
- सज्ज असलेल्या बसेसची संख्या - ७००
- नादुरुस्त बसेसची संख्या -१००
- पाचशे बसेसद्वारे १५०० फेऱ्या
कोल्हापूर विभागातील बहुतांशी कर्मचारी कामावर परतले आहेत. त्यामुळे विभाग पूर्ण क्षमतेने पुन्हा ग्रामीण भागात बससेवा पूर्ववत करीत आहे. सद्यस्थितीत ५०० हून अधिक बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातून १,५०० हून अधिक फेऱ्या पूर्ण होत आहेत. उर्वरित बसेस प्रतिसाद व मागणीप्रमाणे रस्त्यावर धावण्यास सज्ज आहेत. - शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ, कोल्हापूर विभाग