गडहिंग्लज : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या सरळ सेवा भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना तातडीने सेवेत रूजू करून घ्यावे, अशी मागणी गडहिंग्लज तालुक्यातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांनी कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, २०१९-२० च्या सरळ सेवा भरतीत कोल्हापूर जिल्ह्यातील २०७ उमेदवारांची चालक आणि वाहकपदी निवड झाली आहे. त्यांचे विहीत प्रशिक्षणदेखील वर्षापूर्वी पूर्ण झाले आहे.दरम्यान, कोरोनाच्या साथीमुळे ह्यअंतिम चाचणीह्ण होणे बाकी आहे. त्यामुळे नेमणूक न झाल्यामुळे बेरोजगार उमेदवारांना कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे अडचणीचे झाले आहे.सध्या जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे अंतिम चाचणी घेवून लवकरात लवकर सेवेत रूजू करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिष्टमंडळात महेश बैरागी, दीपक भोई, विनायक घुगरे, गणेश चनबसन्नावर, विनायक कंगुरे, रामदास कांबळे, किशोर पाटील व सुरेश खरे आदींचा समावेश होता.