कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर एसटी बसवर होणाऱ्या दगडफेकीमुळे कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्याच बंद करण्याचा निर्णय एस. टी महामंडळाने शनिवारी घेतला. त्यानुसार दुपारपासून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी गाड्या बंद झाल्या. दिवसभरात कोल्हापूर-बेळगाव मार्गावर २६ गाड्या धावतात. कागलपर्यंत कोल्हापूर आगाऱाच्या बसेस धावत असल्याची माहिती विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.कर्नाटकातील एकाने महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात फलाटावर लावलेल्या कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) बसवर दगडफेक केली. त्यात बसचे पंचवीस हजारांचे नुकसान झाले. याप्रकरणी एकनाथ सोमाण्णा हलगीकर यास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.मध्यवर्ती बसस्थानकात शनिवारी सकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी एमएच १३ सीए ७३६८ क्रमांकाची बस कोल्हापूर-स्वारगेट(पुणे) मार्गासाठी फलाटवर उभी होती. या दरम्यान संशयित हलगीकर याने खिशातून आणलेली दगडे बसच्या पुढील काचेवर फेकली. त्यात २५ हजारांचे नुकसान झाले.
दगडफेक करणाऱ्या संशयिताला बसस्थानकातील अन्य चालक, वाहकांनी पकडून प्रथम आगारप्रमुखाच्या स्वाधीन केले. त्यानंतर महामंडळाच्या प्रशासनाने शाहूपुरी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी मध्यवर्ती बसस्थानकात धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले.
बेळगावमध्ये कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या चारचाकीवर हल्ला केल्यानंतर महाराष्ट्र -कर्नाटक वाद पुन्हा उफाळला. त्यानंतर शुक्रवारी रात्री स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांनी कर्नाटकची बससेवा बंद पाडली. या दरम्यान शिवसैनिकांनी मध्यवर्ती बसस्थानकात जोरदार घोषणाबाजी करीत कन्नड रक्षण वेदिकेच्या कृतीचा निषेध करीत प्रत्युत्तर दिले.तोपर्यंत बससेवा बंदकर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळला आहे. प्रत्येकवेळी दोन्ही राज्यांच्या बसेस आंदोलक टार्गेट करीत फोडतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य परिवहन राज्य मार्ग महामंडळाच्या कोल्हापूर आगाराने जोपर्यंत वाद निवळत नाही, तोपर्यंत कर्नाटकात बससेवा सुरू करायची नाही, असा निर्णय घेतला आहे.