आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : सर्वत्र लग्नसराईची धूम सुरू आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कोल्हापूर विभागाच्यावतीने लग्नकार्यासाठी प्रासंगिक करार व ग्रुप बुकिंगवर जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. विभागाच्यावतीने एप्रिल ते जूनपर्यंत या जादा गाड्यांचे नियोजन केले आहे.
राज्य परिवहन महामंडळामार्फत एप्रिल, मे व जून २०१७ हा उन्हाळी गर्दीचा हंगाम असल्याने या महिन्यात प्रवासी वर्गाच्या सोयीसाठी जादा वाहतूक करण्यात येते. कोल्हापूर विभागातर्फे लग्नकार्यासाठी प्रासंगिक करार व ग्रुप बुकिंगवर बसेस देण्याबाबत नियोजन करण्यात आले असून, ज्यांना लग्नकार्यासाठी अथवा अन्य बाबींकरीता बसेस बुक करावयाच्या आहेत त्यांनी नजीकच्या आगाराशी त्वरित संपर्क साधून आवश्यक बसेस बुकिंग करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विवाह मुहूर्तांच्या दिवशी प्रवासी मागणीनुसार जादा वाहतूक करण्यात येणार असून मुख्यत्वे करून ग्रामीण भागातील वाहतूक १०० टक्के करण्याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आगार प्रयत्नशील राहतील, तरी, प्रवासी वर्गाने आपल्या हक्काच्या एस.टी.चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी केले.
विवाह मुहूर्त तारखा
एप्रिल : १७,१९,२०,२१ मे : ४, ५, ७, ८, ९, १४, १६, १७, १८, १९, २१, २२, २३, २७, ३१ जून : २, ३, ५, ८, १०, १२, १३, १५, १७, १८, १९, २०, २८, ३०