कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी अपलोड करण्यासाठी कर्मचारी, अधिकाऱ्यांचा रात्रीचा दिवस सुरू आहे. रविवारी सुट्टी असतानाही महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये २४ तास काम सुरू होते. उद्या, मंगळवारी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. ११ प्रभागांत बदल झाल्याने याकडे इच्छुकांच्या नजरा लागून आहेत.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठीची दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू झाली आहेत. यामध्ये मृत मतदार, स्थलांतरित मतदारांचा सर्व्हेतून शोध घेणे, प्रारूप मतदार यादी करणे, राज्य निवडणूक आयोगाकडे यादी अपलोड करणे, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती, सूचना घेणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करणे असे टप्पे आहेत. सध्या प्रारूप मतदार यादी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवारी पहाटे चारपर्यंत मतदार यादी अपलोडचे काम सुरू होते. यानंतर रविवारीही २४ तास काम सुरूच होते. या कामासाठी ५० कर्मचारी तैनात केले आहेत. त्यांच्यासह उपायुक्त निखिल मोरे, रविकांत आडसुळ, सुधाकर चल्लवाड, युवराज दबडे आदी उपस्थित होते.
१२ मार्चला होणार अंतिम मतदार यादी
उद्या, मंगळवारी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती आणि सूचना घेतल्या जाणार असून १२ मार्चला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार असून यानंतर निवडणुकीचा अंतिम कार्यक्रम जाहीर होणार आहे. यामध्ये अर्ज दाखल करणे, माघार, चिन्ह वाटप, मतदान आणि निकालाचा समावेश असणार आहे.
चौकट
१५ जानेवारीपूर्वी नोंदणी केलेल्यांनाच मतदानाचा अधिकार
महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार १५ जानेवारी २०२१ ची मतदारी यादी ग्राह्य धरली असून त्यानुसार महापालिका निवडणुकीसाठी यादी केली जात आहे. यामुळे १५ जानेवारीनंतर नोंदणी होणाऱ्यांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही. नवीन नोंदणी केलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.