कोल्हापूर : महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेचे प्रणेते यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा जिल्हा परिषदेच्या आवारात उभारण्यात आला. परंतु प्रासंगिक वेळी हार घालण्यासाठी याठिकाणी जिनाच नसल्याने अशी यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी याठिकाणी चव्हाण यांना अभिवादन केले. या वेळी ही बाब प्रकर्षाने समोर आली.
जानेवारी २०२१ मध्ये याठिकाणी पुतळा उभारण्यात आला आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. परंतु या उंच पुतळ्याला हार घालताना अडचणी येत आहेत. याठिकाणी कायमस्वरूपी जिना नसल्याने हार घालण्यासाठी जाता येत नाही. प्रत्येकवेळी क्रेन आणणे शक्य होत नाही. त्यामुळे ज्यावेळी याठिकाणी अभिवादन करायचे असेल त्यावेळी खाली उभे राहूनच फुले वाहावी लागतात.
अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी माजी अध्यक्ष बजरंग पाटील आणि सदस्य विजय बोरगे यांच्या समवेत चव्हाण यांच्या पुतळ्याजवळ फुले वाहून त्यांच्या स्मृतीस अभिवादन केले. त्यावेळी हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. आता बांधकाम विभागाने याबाबत तातडीने हालचाल करण्याची गरज आहे.
१४०७२०२१ कोल झेडपी ०१
जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष राहुल पाटील यांनी बुधवारी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस अभिवादन केले. या वेळी माजी अध्यक्ष बजरंग पाटील व सदस्य विजय बोरगे उपस्थित होते.