कोल्हापूर : जीवाची पर्वा न करता महापूर काळात झोकून देऊन वीज जोडणीची कामे करून ग्राहकांना सेवा देण्याचे कर्तव्य बजावणा-या कर्मचा-यांच्या पाठीवर महावितरणने बक्षिसाच्या रूपाने कौतुकाची थाप दिली. महावितरणच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात मुख्य अभियंता अनिल भोसले, अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांच्या हस्ते १२४७ कर्मचा-यांचा गौरव करताना ५९२ कर्मचा-यांना प्रशस्तिपत्रासह रोख बक्षीस देऊन त्यांनी दाखविलेल्या धाडसाचे, सेवेचे तोंडभरून कौतुक केले.
महापूर काळात सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा थांबविणे, पूर ओसरल्यानंतर तो पुन्हा सुरू करणे ही दोन्ही कामे आव्हानात्मक आणि जीवावर बेतणारी होती; पण तरीदेखील डगमगून न जाता या कर्मचा-यांनी अहोरात्र सेवा बजावली. याची दखल समाजातील इतर घटकांनीही जशी घेतली, तशीच या कर्मचा-यांची संस्था असलेल्या महावितरणनेही घेतली. महावितरणच्या सांघिक कार्यालयाने रोख बक्षीस देण्यासाठी पाच लाख रुपये दिले. यातूनच या कौतुक सोहळ्याचा कार्यक्रम झाला.
मोठी जोखीम पत्करून विशेष कार्य करणा-या जिल्ह्यातील ४७५ नियमित कर्मचा-यांना रोख बक्षीस व उत्कृष्ट कर्मचारी, ११७ बाह्यस्रोत कर्मचाºयांनाही रोख बक्षिसाने गौरविण्यात आले. या कर्मचा-यांना भरीव साथ देणा-या ६५५ नियमित कर्मचाºयांनाही उत्कृष्ट कर्मचारी असे प्रशस्तिपत्र देण्यात आले. कार्यक्रमापूर्वी वीजेचा शॉक लागून मृत्युमुखी पडलेले कर्मचारी संजय जाखले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रास्तविक अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी केले. सूत्रसंचालन शकील महात, संभाजी कांबळे यांनी केले. आभार कार्यकारी अभियंता राजेंद्र हजारे यांनी मानले.महापुराशी दोन हात .....महापूर काळात झालेले काम हे पराकोटीची निष्ठा आणि कामाप्रती बांधीलकीचा आदर्श दर्शविणारे होते. कर्मचाºयांसह येथे येणाºयांनाही त्याची प्रेरणा मिळावी, कष्टाची जाणीव व्हावी म्हणून महापुराशी दोन हात असा आशय लिहिलेले भित्तिचित्र तयार करण्यात आले आहे. महावितरणच्या ताराबाई पार्क कार्यालयासमोर या भित्तिचित्राचे अनावरण अधिका-यांच्या हस्ते झाले.