लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यात मुद्रांकांचा प्रचंड काळाबाजार सुरू आहे. शंभर रुपयांचा मुद्रांक १२० रुपयांना विकला जात आहे. या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊनही काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. मुद्रांक अधिकारी व मुद्रांक विक्रेते यांचे साटेलोटे असल्याची चर्चा जनतेत सुरू आहे.
शाहूवाडीत मुद्रांकांची टंचाई नसतानाही विक्रेत्यांकडून काळाबाजार सुरू आहे. मलकापूर, शाहूवाडी, बांबवडे भागातील विक्रेत्यांकडून ग्राहकांची अडवणूक सुरू आहे. प्रत्येक मुद्रांकांसाठी जादा २० ते ३० रुपये घेतले जात आहेत. सर्व मुद्रांक विक्रेते ॲपिडेव्हिट घालत असतात त्यांचे १५० ते २०० रुपये घेऊन ग्राहकांचा खिसा रिकामा केला जात आहे. ग्राहकाने विचारले तर मुद्रांक शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. शासनाने मालमत्ता खरेदीसाठी ५० टक्क्यांची सूट जाहीर केली आहे. त्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुद्रांकाची प्रचंड मागणी वाढली आहे. याचा फायदा मुद्रांक विक्रेते उचलत आहेत.
तालुक्यात महा-ई-सेवा, आपले सरकार केंद्र गावागावांत विनापरवाना सुरू आहेत. मुद्रांक विक्रेत्यांनी एजंट नेमले आहेत. यांच्यामार्फत मुद्रांक खरेदी करून ग्राहकांची लूट केली जाते. शाहूवाडी, मलकापूर मुद्रांक विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात ग्राहकांची लूट केली जात असून, मुद्रांक विक्रेत्यांनी मोठी माया गोळा केली आहे. अशा मुद्रांक विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.
शासनाच्या संबंधित विभागाने जादा दराने मुद्रांक विक्री करणाऱ्या विक्रेत्याची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करणार आहे.
दत्ता पोवार, तालुकाप्रमुख
शिवसेना शाहूवाडी.