कोल्हापूर : मुद्रांक कार्यालयात शासकीय मूल्यांकन करण्यासाठी नगररचना विभागात प्रमुख तीन पदे रिक्त असल्याने विविध मिळकतींचे हुकुमनामे, अधिनियमीत मूल्यांकनाची कामे बंद आहेत. त्यामुळे महिनाभरात सुमारे २५ प्रकरणांच्या फाईल्स निर्णयाविना अडकल्या आहेत. प्रमुख रिक्त पदांपैकी मुद्रांक जिल्हाधिकारी हे पद तर तब्बल पावणेदोन वर्षे रिक्त आहे. त्यामुळे कोट्यवधींच्या व्यवहाराचा फटका बसत आहे तर पक्षकारांना नाहक हेलपाटे मारावे लागत आहेत.
शासकीय मुद्रांक कार्यालयात मिळकतींबाबत कोर्टाचे हुकुमनामे, करारपत्र, वटमुखत्यारपत्र, अधिनियमीतता आदी मिळकतींचे मूल्यांकन करुन घ्यावे लागते. त्यानंतरच मुद्रांकाची रक्कम निश्चित होते. परंतु, या कार्यालयातील रिक्त २३ पदांपैकी प्रमुख तीन पदांवर अधिकारीच नसल्यामुळे येथील कारभार खोळंबला आहे. येथील मुद्रांक जिल्हाधिकारी वर्ग-१ हे पद तर १५ जुलै २०१९ पासून रिक्त आहे तर या पदाचा अतिरिक्त भार हा सहाय्यक जिल्हा निबंधक डी. आर. पाटील यांच्याकडे सोपविला आहे.
रिक्त प्रमुख पदांपैकी दोन अधिकाऱ्यांची सात महिन्यांपूर्वी पदोन्नतीवर बदली झाली. त्यानंतर या दोन रिक्त पदांवर अधिकारी नियुक्त करण्याचे भान शासनाला राहिले नाही तर तिसरे सहाय्यक रचनाकार हे महाशय महिन्यापूर्वी लाच प्रकरणात अडकले. त्यानंतर मात्र शासकीय मूल्यांकनाचे काम थांबले. अनेक महत्त्वाच्या मिळकतींच्या शासकीय मूल्यांकनाच्या प्रलंबित फाईल्स वाढत आहेत. दर महिन्याला किमान १० ते १५ प्रकरणे दाखल होतात, परंतु शासकीय मूल्यांकनच थांबल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार अडकले आहेत.
९१ टक्के उद्दिष्ट पूर्ण
शासनाने कोल्हापूरच्या मुद्रांक कार्यालयाला २५० कोटींचे उद्दिष्ट दिले, त्यापैकी फेब्रुवारी २०२१ अखेर ९१ टक्के पूर्ण केल्याचे प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी डी. आर. पाटील यांनी सांगितले. मार्च, एप्रिल, मे या कोरोना कालावधीत मुद्रांकाचे उद्दिष्ट पूर्ण करताना अडचणी आल्या. परंतु, मुद्रांक भरणाऱ्यांना २ टक्के सवलत दिल्याने मुद्रांक शुल्क जमा करणाऱ्यांना दिलासा मिळाला.
मुद्रांक कार्यालयातील २३ रिक्त जागा
- सहाय्यक नगररचनाकार - १
- रचनाकार सहाय्यक - २
- मुद्रांक जिल्हाधिकारी - १
- सहाय्यक उपनिबंधक - ४
- मुद्रांक दुय्यम निबंधक - ४
- लिपिक - ७
- शिपाई - ४
कोट...
कोल्हापूर मुद्रांक नोंदणी कार्यालयात प्रमुख पदे रिक्त असल्यामुळे मोठ्या मिळकतींचे शासकीय मूल्यांकन करताना अडचणी वाढत आहेत. कार्यालयात एकूण २३ रिक्त पदे आहेत. पुणे नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर, उपमहानिरीक्षक हिंमत खराडे यांच्यासोबत या आठवड्यात बैठक आहे, त्यामध्ये या रिक्त पदांचा प्रश्न निकाली निघेल.
- डी. आर. पाटील, प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी, कोल्हापूर.