आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १७ :‘गोकुळ’ने सहकाराच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय करताना उत्पादक व ग्राहकांना केंद्रबिंदू मानून काम केले. त्यामुळे सर्वाधिक ९३ कोटींचा दूध दर फरक देऊन उत्पादकांना आर्थिक दिलासा दिला. राज्यातील दूध संघांना हे काम प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राजारामबापू सहकारी दूध संघाचे संचालक उदयसिंग पाटील यांनी केले.
‘गोकुळ’ ने उत्पादकांना ९३ कोटींचा दूध फरक दिल्याबद्दल ‘राजारामबापू’ संघाच्या पदाधिकाऱ्यांनी संघास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी त्यांनी संघाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक व संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा सत्कार केला. सामान्य माणूस दूध व्यवसायात असल्याने त्याचा विचार करूनच ‘गोकुळ’ ध्येय-धोरण राबवत असतो. विविध योजनांच्या माध्यमातून उत्पन्नातील जास्तीत जास्त रक्कम उत्पादकांच्या पदरात कशी पडेल, यासाठीच संचालक मंडळ नेहमी कार्यरत आहे. यामुळे आम्ही कोणत्याही आव्हानास तोंड देण्यास समर्थ असल्याचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी सांगितले.
‘राजारामबापू’ संघाचे संचालक बजरंग खोत , प्रशांत थोरात, अशोक पाटील, शशिकांत पाटील, सौ. उज्ज्वला पाटील, सौ. मंगल बाबर, अनिल खरात, बबन सावंत, पोपटराव जगताप यांच्यासह ‘गोकुळ’चे महाव्यवस्थापक आर. सी. शाह उपस्थित होते.