कणकवली : कलावंतांनी राजकीय पक्षाच्या चुकीच्या धोरणाविरोधात उभे रहायला हवे. कोण काय म्हणेल याचा विचार न करता कलावंतांनी ठोस अशी भूमिका घ्यायला हवी, दडपशाहीच्या विरोधात उभे राहणे हे कलावंतांचे कर्तव्यच आहे, असे मत विख्यात अभिनेते अमोल पालेकर यांनी येथे व्यक्त केले.येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी प्रायोगिक नाट्य महोत्सवाच्या निमित्ताने प्रतिष्ठानच्या नाट्यतीर्थावर अमोल पालेकर यांच्या प्रकट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.प्रसाद घाणेकर यांनी अमोल पालेकर यांची मुलाखत घेतली. पालेकर म्हणाले, सत्यदेव दुबे यांनी माझ्याकडे वेळ असल्याचे पाहून नाटकात काम करण्याबाबत मला विचारले. मी हो म्हणालो आणि अपघातानेच या क्षेत्रात आलो; पण आज चित्रपटात अभिनय करायचे सोडून २४ वर्षे झाली तरी लोक विचारतात तुम्हाला अभिनय करावासा वाटत नाही का? पण आता या माध्यमाची संपूर्ण जाणीव होण्यासाठी दिग्दर्शन मला महत्त्वाचे वाटते. भुमित्रा, श्यामानंद जालन, मोहन राकेश, विजय तेंडुलकर, गिरीश कर्नाड अशा रंगभूमीवरच्या दिग्दर्शकांशी जवळीक साधता आली.विजय तेंडुलकरांच्या रंगसूचना खूप असतात; पण मी दुबेंच्या घराण्यात तयार झालेला असल्याने मी तेंडुलकरांच्या घराण्याच्या विरोधातला असे समजायला हरकत नाही. माझ्या नाट्य, चित्रपट प्रवासात लोकांना काय आवडेल याचा मी विचार केला नसल्याचे पालेकर यांनी सांगितले. आणीबाणीच्या विरोधात जनतेला काही तरी सांगायचे म्हणून बादल सरकार यांचे जुलुस हे नाटक केले. त्याकाळात नाटक सादर झाल्यावर किंवा त्याच्या तालमी सुरू असताना आम्ही त्यावर खूप चर्चा करीत असू त्याचा आम्हाला पुढील काळात खूप मोठा फायदा झाल्याचे ते म्हणाले. नाटक आणि चित्रपटांची सगळी माहिती आज एका क्लिकवर उपलब्ध होते. पण, त्याच्या खोलात जाऊन अभ्यास करावा असे आजच्या पिढीला वाटत नाही. चांगली साहित्यकृती आपल्या समोर नवीन आव्हाने उभी करीत असते. ‘पहेली’ ही मूळ राजस्थानी कथा आहे. तिच्यावर भाष्य करण्यासाठी मी चित्रपट बनविला. आपल्याकडे जनावरांनाही नकार देण्याचा अधिकार असतो; पण तेवढा तो स्त्रिला नसतो. अनेक दिग्दर्शक म्हणतात, मूळ कथेशी प्रामाणिक राहून नाटक, चित्रपट बनविला. पण, ते बरोबर नाही. आपण त्यातून काय सांगू पाहतो आहोत हे महत्त्वाचे आहे. त्यातून कथेवर अन्याय होतो हे म्हणणे चुकीचे आहे, असेही पालेकर यांनी यावेळी सांगितले.(प्रतिनिधी)सत्यदेव दुबेंमुळेच माझा प्रवास सुखकरसत्यदेव दुबेंमुळे माझा हा प्रवास सुरूझाला. त्यांनी माझ्यावर खूप विश्वास टाकला. तसेच तीन नाटकांत काम केल्यावर त्यांनीच मला चौथे नाटक दिग्दर्शनासाठी दिले. तिथूनच माझा दिग्दर्शनाचा प्रवास सुरूझाला. त्यातून मला थिएटरमधले विलक्षण नेटवर्किंग कळत गेले.कणकवली येथील आचरेकर प्रतिष्ठानच्यावतीने प्रसाद घाणेकर यांनी अभिनेते अमोल पालेकर यांची गुरुवारी मुलाखत घेतली.
दडपशाहीविरोधात उभे रहा
By admin | Published: February 17, 2017 11:39 PM