कोल्हापूर : विधान परिषदेच्या निवडणुक आचारसंहितेत अडकलेल्या महानगरपालिकेतील स्थायी ,परिवहन आणि महिला व बाल कल्याण समिती सदस्यांच्या निवडी येत्या १३ जानेवारीला होत आहेत. त्यासाठी मनपाची विशेष सभा बोलविण्याची सूचना महापौर अश्विनी रामाणे यांनी सोमवारी नगरसचिव कार्यालयास केली. स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम मात्र आज, मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुक १ नोव्हेंबर रोजी झाली. १५ नोव्हेंबरला सभागृह अस्तित्वात येऊन महापौर, उपमहापौर पदाची निवडणूकही पार पडली. त्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात स्थायी समिती, परिवहन समिती, शिक्षण समिती, महिला व बाल कल्याण आदी समितींच्या सदस्यांची आणि स्वीकृत नगरसेवक यांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होणार होता. परंतु अचानक विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या निवडी लांबल्या. आता आचारसंहिता संपल्यामुळे या निवडी केंव्हा होणार याकडे मनपा वर्तुळाचे लक्ष लागून राहिले होते. महापौर अश्विनी रामाणे यांनी सोमवारी या निवडी करण्यासाठी येत्या १३ जानेवारीला विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्याची सूचना नगरसचिव उमेश रणदिवे यांना केली. महापौरांच्या सुचनेनुसार सायंकाळी सभेचा अजेंडा प्रसिद्ध केला. १३ जानेवारीच्या सभेत फक्त स्थायी, परिवहन आणि महिला व बाल कल्याण समितीच्या सदस्यांची निवड होणार आहे. प्राथमिक शिक्षण मंडळ समिती तसेच स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम स्वतंत्रपणे घेतला जाणार आहे. सर्व सदस्यांच्या निवडी या नगरसचिव कार्यालयाच्या देखरेखेखाली होणार आहेत, मात्र स्वीकृत नगरसेवकांचा कार्यक्रम हा आयुक्तांच्या देखरेखीखाली होईल. स्थायी समितीचे १६ सदस्य राहतील. नगरसेवकांच्या संख्येच्या प्रमाणात त्या त्या समितीवर ज्या त्या पक्षाला प्रतिनिधीत्व मिळणार आहे.
स्थायीसह समिती निवडी १३ला
By admin | Published: January 05, 2016 1:04 AM