लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : घाण्याचे तेल कितीही आरोग्यदायी असले तरी लीटरचा दर बघूनच अनेकांच्या काळजात धस्स होते. त्यामुळे रिफाईन्ड तेलामुळे चरबी वाढते, आजारांना आमंत्रण मिळते हे किती जरी खरे असले तरी शेवटी खिशाला बसणारा भारच महत्त्वाचा ठरत असल्याचे बाजारातील चित्र आहे.
पूर्वी गावागावात घाणे असायचे. शेतात पिकणारा भुईमूग, करडई, सूर्यफुलापासून तेल काढून तेच वापरले जाई. त्यामुळे आजारांना फारसा थारा नसायचा. काळ बदलला तसा घाणाही मागे पडत गेला आणि घरगुती तेलही. घरोघरी रिफाईन्ड केलेले तेलाचे डब्बे येऊ लागले. स्वस्त आणि मस्त म्हणून वापरही वाढला. याचे व्हायचे तसेच परिणाम होऊ लागले. स्थुलता वाढली, हृदयविकारासारख्या आजारांनी घरोघरी ठाण मांडले. यातच कोरोनाची साथ आली आणि पुन्हा जुन्या काळातील जगण्याचे महत्त्व वाढू लागले. त्यात घाण्याचे तेल हा एक नवा बदल. लाकडी घाण्यावरचे तेल विकत घेण्याच्या पर्यायाचा विचार सुरु झाला. लोकांची मागणी वाढल्याने हे घाणेही जागोजागी दिसू लागले.
चौकट
घाण्याचे तेल २९० रुपये लीटर
कोल्हापूर शहरात दोन ठिकाणी असे घाणे सुरु आहेत. येथे निघणाऱ्या तेलाचे प्रमाण कमी आहे, साहजिकच त्याचा दरही जास्त आहे. रिफाईन्ड तेल १६० ते १८० रुपये किलो मिळत असताना हे घाण्यावरचे तेल मात्र २९० रुपये लीटर आहे. जवळपास दुप्पट रक्कम असल्याने किती इच्छा असली तरी सर्वसामान्य नागरिक ते घेऊ शकत नाहीत. आजघडीला हेल्थ कॉन्शस आणि उच्चभ्रू समाजातील कुटुंबांकडून या तेलाला मागणी आहे. साधारणपणे एकूण खाद्यतेलाच्या मागणीपैकी याचा टक्का १० टक्के इतका अत्यल्प आहे.
चौकट
घाण्याचे तेल हे आरोग्यदायी आहे. यात तेलावर होणारी प्रक्रिया फारशी होत नाही. त्यामुळे याचा शरिरावर फारसा परिणाम होत नाही. हे तेल काढण्यासाठी पूर्वी बैलाचा वापर होत असे, आता त्याला इंजिनची जोड दिली असली तरी त्याचा वेग फारसा नसल्याने उत्पादन कमी निघते.
चौकट
रिफाईन्ड तेल घातक का?
रिफाईन्ड तेलावर फिजिकल, केमिकल अशी दोन प्रकारे प्रक्रिया केली जाते. बाजारात मिळणारे आघाडीचे ब्रॅण्ड हे केमिकल प्रक्रिया केलेलेच असतात. याउलट अलीकडे गरम पाण्याच्या वाफेद्वारे केली जाणारी फिजिकल ही प्रक्रिया मात्र आरोग्याच्या दृष्टीने रिफाईन्डच्या तुलनेत कमी प्रमाणात असल्याने ती शरिराला अपायकारक ठरत नाही.
प्रतिक्रिया
रिफाई्न्ड तेलावर केमिकल प्रक्रिया होत असल्याने याचा वापर शरिरासाठी घातक असतो. यात वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे शरिरातील चरबीचे प्रमाण वाढते. यामुळे रक्तात चरबीच्या गाठी होणे, स्थुलता येणे, हार्ट ॲटॅक आणि हार्ट स्ट्रोक बसणे असे आजार होतात. यामुळे रोजच्या आहारातील तेलाचे प्रमाण कायम नियंत्रणात राहील, असा प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- डॉ. सुषमा उदय व्हटकर, मोरेवाडी
प्रतिक्रिया
आम्ही चार वर्षांपासून लाकडी घाणा चालवतो. याचे उत्पादन कमी असल्याने दरही जास्त आहेत. मोजकेच ग्राहक या तेलाची मागणी करतात. यापेक्षा केमिकल नसलेल्या तेलाचा पर्याय लोक जवळ करत आहेत.
- संदीप अथणे, खाद्यतेल व्यापारी व लाकडी घाणा चालक, शाहू मिल चौक