कोल्हापूर : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या अंतर्गत पहिल्या अपत्यासाठी मातांना पाच हजार रुपये देण्याची योजना २०१७ पासून सुरू आहे. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील ८६ हजार २४६ मातांना ४० कोटी ३३ लाख रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले आहे. सध्या १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर हा सप्ताह ‘मातृवंदना संप्ताह’ म्हणून राज्यभर साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहामध्ये अधिकाधिक गरोदर महिलांची नोंदणी करण्यात येणार आहे.
माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी गर्भवती महिला आणि स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी १ सप्टेंबर २०१७ पासून केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. सुरुवातीला राज्यातील १६ जिल्ह्यांत सुरू केलेली ही योजना आता राज्यभर लागू करण्यात आली आहे. महिलेची प्रसूती शासकीय रुग्णालयातच केली पाहिजे, अशी यामध्ये अट नाही. परंतु गरोदरपणाची नोंद शासकीय रुग्णालयात करणे बंधनकारक आहे. घरातील प्रसूती कमी करण्यासाठी या योजनेचा चांगला फायदा होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
चौकट
तीन टप्प्यांत मिळणार पैसे
१ पहिला टप्पा/ गरोदर मातेने शेवटच्या मासिक पाळीपासून १५० दिवसांच्या आत शासकीय आरोग्य संस्थेमध्ये गरोदरपणाची नोंदणी केल्यानंतर १००० रुपये खात्यावर जमा केले जातात.
२ दुसरा टप्पा/ शासकीय अथवा खासगी रुग्णालयात किमान एकदा प्रसूतीपूर्व आरोग्य तपासणी केल्यास गर्भधारणेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर २ हजार रुपये जमा केले जातात.
३ तिसरा टप्पा/ शासकीय अथवा खासगी रुग्णालयामध्ये बाळाचे १४ आठवड्यांपर्यंतचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यास व बाळाच्या जन्मदाखल्याची छायांकित प्रत सादर केल्यानंतर उर्वरित २ हजार रुपये जमा केले जातात.
चौकट
पात्रतेचे निकष काय
१ लाभार्थी महिलेचे व तिच्या पतीचे आधार कार्ड
२ महिलेचे आधार संलग्न बॅंक खाते
३ गरोदरपणातील शेवटच्या मासिक पाळीपासून १५० दिवसांच्या आत शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नोंद हवी
४ शासकीय रुग्णालयात प्रसूतीपूर्व तपासणीच्या नोंदीची झेरॉक्स किंवा खासगी रुग्णालयात तपासणी केली असल्यास केसपेपरची झेरॉक्स
५ शासकीय, खासगी रुग्णालयात बाळाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्याचे कार्ड झेरॉक्स व बाळाचा जन्मनोंदणी दाखला.
चौकट
या ठिकाणी करा संपर्क
जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, सीपीआर रुग्णालय, आपल्या परिसरातील उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालये. तसेच गावात येणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांकडेही चौकशी केल्यास या योजनेची माहिती मिळू शकते.
चौकट
कोल्हापूर जिल्ह्यात मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच डिसेंबर २०१७ पासून ९१ हजार ८४७ लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली. त्रुटी असणारे लाभार्थी वगळून उर्वरित लाभार्थ्यांना लाभ दिला आहे.
डॉ. योगेश साळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर
०३०९२०२१ कोल मातृवंदना डमी