कोल्हापूर : गेले दीड वर्ष शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण. बाहेर खेळायला जाण्यावर मर्यादा. ऑनलाईन पाहिजे ते खाणं घरपोच. या सगळ्यामध्ये एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यातील काही गावांमध्ये कुपोषित बालकांची नोंद झालेली असताना दुसरीकडे शहरातील मुलांचे वजन मात्र वाढतच चालल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळकरी मुलांमधील वाढता स्थूलपणा हा पालकांच्या दृष्टीनेही चिंतेचा विषय बनला आहे.
गेल्या मार्च २०२०पासून जगभरात कोरोनाचा कहर सुरू झाला. शाळा बंद झाल्या, मैदाने बंद करण्यात आली. या जीवघेण्या नव्या आजाराबाबत फारशी कोणालाच माहिती नसल्याने शक्य ती सर्व काळजी घेण्यासाठी प्राधान्य दिले गेले. संसर्गातून हा आजार वाढत असल्याने मुलांवर तर फारच मर्यादा आल्या. एरव्ही वेळ मिळाला की बाहेर हुंदडणाऱ्या मुलांवर मोठी बंधने आली. त्यांना आजाराचे गांभीर्य नसल्याने मग मोबाईल आणि टीव्हीसाठी हट्ट सुरू झाला. बाहेर जाण्यापेक्षा घरात बसलेला बरा म्हणून मग या मागण्या पूर्ण केल्या जाऊ लागल्या.
काही काळानंतर अधिकृतपणे ऑनलाईन अध्यापन सुरू झाले. त्यामुळे पुन्हा स्क्रीनटाईम वाढला. गेले वर्षभर मुले मोबाईलवरच शाळा शिकत आहेत. हे शिक्षण संपल्यानंतर मग त्यांच्या आवडीचे गेम मोबाईलवरच खेळत आहेत. ते झाल्यानंतर पुन्हा टी. व्ही. लावला जात आहे. त्यामुळे खेळणे, पळणे मागे पडले आहे. त्यामुळे स्थूलतेचे प्रमाण वाढत आहे.
चौकट
जिल्ह्यातील कुपोषित बालकांची आकडेवारी
मध्यम कुपोषित ७३१
तीव्र कुपोषित ३७
चौकट
शहरात स्थूलता ही नवी समस्या
ग्रामीण भागात किमान मुले शेताकडे जाणे, जनावरांना चारायला नेणे या कामात तरी आहेत. शहरातील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळेच घरातच बसून असणारी, ऑनलाईन मागवून खाणारी आणि बेकरी पदार्थांवर ताव मारणाऱ्या मुलांच्या स्थूलतेची नवी समस्या वाढत असल्याचे चित्र आहे.
चौकट
पालकांचीही चिंता वाढली
कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आम्ही पालकांनी मुले बाहेर पडू नयेत, यासाठी लक्ष दिले. परंतु, आता आम्ही आमच्या कामासाठी बाहेर पडत आहोत. मुले ऑनलाईन अभ्यास झाल्यानंतर पुन्हा टी. व्ही. बघतात. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे त्यांना बाहेर सोडतानाही भीती वाटते. त्यामुळे अनेकवेळा त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागतात. त्यामुळे स्थूलतेपासून चिडचिडेपणा वाढत असल्याचे निरीक्षण आहे.
ए. एस. हुक्केरीकर
पालक
आता शाळा नसल्यामुळे मुले २४ तास घरातच आहेत. त्यामुळे एका ठिकाणी बसून कंटाळा आला म्हणायचे. मोबाईल मागून घ्यायचे. टीव्ही लावायचा. मोबाईलवर खेळताना आणि टीव्ही बघताना खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यांच्या या सवयी कशा मोडायच्या, याची आता चिंता लागली आहे.
- अस्मिता पाटील, पालक
तज्ज्ञ काय म्हणतात
१ कोरोना काळात मुलांच्या शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या आहेत. त्यांचा बैठेपणा वाढला आहे. बेकरी उत्पादने खाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे स्थूलता वाढली असून, मुलांच्या आरोग्याचे अन्य काही प्रश्नही निर्माण झाले आहेत.
डॉ. राहुल शिंदे, बालरोगतज्ज्ञ
२ मुले घरातच असल्यामुळे बध्दकोष्ठता वाढली आहे. मुले चिडचिडी झाल्याच्याही तक्रारी आहेत. बसून खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे पोटावरच्या चरबीचे प्रमाण वाढले आहे. मुलांमध्ये नकारात्मकता वाढत असल्याचे दिसून येत आहे.
- डॉ. संगीता कुंभाेजकर, बालरोगतज्ज्ञ
चौकट
कारणे काय
१ मोबाईलवरून शाळा सुरू असल्याने आणि बाहेर पडण्यावर मर्यादा असल्याने मुले-मुली घरातच बसून आहेत. त्यामुळे शारीरिक हालचालींवर मोठ्या मर्यादा आल्या आहेत.
२ घरोघरी कोरोना काळात विविध पदार्थ करण्यावर भर. त्यामुळे मुलांचे या प्रकारचे खाणेही वाढले. ऑनलाईन हवे ते मागवून खाण्याचेही प्रमाण वाढले.
३ मुलांचा आरआओरडा नको म्हणून पालकही काही गोष्टी निमूटपणे सहन करत असल्याचे दिसून आले.
४ पालक घराबाहेर पडल्यानंतर मुलांवर नियंत्रण नाही.