देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला : दरड कोसळल्याने अद्याप चार मार्ग बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
राजाराम लोंढे, कोल्हापूर : प्रवाशांची घटणारी संख्या, वाढलेले डिझेलचे दरामुळे अगोदरच अडचणीत आलेली एसटी, कोरोना आणि त्यापाठोपाठ आलेल्या महापुराने अधिकच अडचणीत आली आहे. अतिवृष्टीमुळे अनेक मार्गावरील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाल्याने त्याचा फटकाही एसटीला बसत आहे. देखभाल दुरुस्तीच्या खर्चात वाढ होत असून महापूर ओसरून महिना झाले तर दरड कोसळल्याने अद्याप चार मार्ग बंद आहेत.
गावोगाव, वाड्यावस्त्यांवर जाणारी सामान्य माणसांची ‘लालपरी’ आर्थिक नियोजनामुळे काहीसी अडचणीत आली आहे. राज्य परिवहन महामंडळाने उत्पन्न वाढीचे अनेक प्रयोग केले असले तरी खासगी वाहतूक आणि प्रवाशांची बदलेली मानसिकतेमुळे त्यात फारसा फरक पडला नाही. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे तर एसटीची अवस्था फारच बिकट झाली. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून अतिवृष्टी आणि महापुरामुळे आर्थिक तोट्यात भर पडली. यावर्षी जुलै महिन्यातील महापूर व अतिवृष्टीने सगळ्याच घटकांचे नुकसान झाले. महापुरात आठ-दहा दिवस एसटीची वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्यानंतर रस्ते तुटले, लहान पूल वाहून गेले, दलदलीमुळे अनेक मार्गावर एसटी धावू शकली नाही. महापूर ओसरून महिना झाले तरी अद्याप जिल्ह्यातील चार मार्ग बंद आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. खराब रस्त्यांमुळे एसटीच्या देखभाल दुरुस्तीच्या खर्चात काहीसी वाढ झाली आहे.
एसटीचे दिवसाला २५ लाखाने उत्पन्न घटले
कोरोनामुळे एसटीची विस्कटलेली अद्याप बसलेली नाही. कोल्हापुरातून जिल्ह्यांतर्गत व राज्यासह बाहेर जाणाऱ्या रोज एक हजार फेऱ्या होत्या. आता त्या काहीशा कमी झाल्या असून एसटीचे दिवसाला किमान २० ते २५ लाखाचे उत्पन्न घटले आहे.
या मार्गावरील फेऱ्या बंद....
कोल्हापूर ते रत्नागिरी (आंबा घाटात दरड कोसळल्याने बंद)
कोल्हापूर ते पन्हाळा (बुधवार पेठ येथे रस्ता तुटल्याने बंद)
मलकापूर ते आंबा (पूर्ण बंद)
गगनबावडा ते खारेपाटण (भुईबावडा येथे दरड कोसळल्याने बंद)
कोट-
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील रस्ते खराब झाले आहेत, त्याचा फटका एसटीला बसतो, हे खरे आहे. काही मार्ग बंद आहेत, तर काही ठिकाणची वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.
- शिवराज जाधव, विभागीय वाहतूक अधिकारी, काेल्हापूर