कोल्हापूर : कोरोनामुळे एकूणच आर्थिक घडी विस्कटली असताना त्यात महागाईने कहर केल्याने स्वयंपाकघराच्या खर्चात गेल्या वर्षभरात तब्बल दीडपटीने वाढ झाली आहे. एका त्रिकोणी, चौकोनी कुटुंबाचा महिन्याचा खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन हजारांपेक्षा जास्त रकमेने वाढला आहे. खाद्यतेल, गॅस, साखर, डाळी, कडधान्याच्या दरवाढीचा थेट परिणाम स्वयंपाकघरावर होत असून वाढलेला खर्च पाहिल्यावर ‘आमदन्नी आठण्णी खर्चा रुपय्या’ अशी परिस्थिती असल्याचे घराघरातील चित्र आहे.
कोरोना आणि त्याला जोडून आलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. व्यवसाय सुरळीत झालेले नाहीत. कमाई कमी झाल्याने घरचा खर्च भागवताना नाकीनऊ येत असताना कोरोना व त्या अनुषंगाने आलेल्या आजारांच्या औषध खर्चाचा भारही वाढला आहे. अशा परिस्थितीत पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल आणि पाठोपाठ गॅसही वाढल्याने स्वयंपाकघराचा अक्षरश: भडका उडाला आहे. त्यातच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही वाढ झाल्याने सकस खाण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुकामेव्यासह मसाल्यांच्या दरातही मोठी वाढ झाल्याने स्वयंपाकघराच्या बजेटचा ताळमेळच बिघडून गेला आहे. काय आणि किती आणायचे, कसे आणि कुठे वाचवायचे याचे आडाखे घरोघरी बांधले जात आहेत. कितीही कमी केले तरी शेवटी मिळणाऱ्या पैशापेक्षा जाणारा पैसाच जास्त होत असल्याने गृहिणींची डोकेदुखी वाढली आहे. बाजारपेठेचा सध्याचा आढावा घेतला तर डाळी, कडधान्यांचे दर पुन्हा वाढू लागले आहेत. किलोमागे १० ते २० रुपयांची वाढ दिसत आहे.
फोडणी परवडेना
खाद्यतेलाचे दर गेल्या पाच सहा महिन्यांच्या तुलनेत स्थिर आहेत. हा दिलासा असलातरी तरी ते मुळातच वाढलेले असल्याने तेलाचा एक डबा घेतानाही अजूनही अडीच हजार मोजावे लागत आहेत. त्यामुळे फोडणीला काहीसा हात आखडता घेतला जात आहे. आता तर सण उत्सव तोंडावर असल्याने खाद्यतेलाची मागणी वाढणार असल्याने पुन्हा महागाईला तोंड द्यावे लागणार आहे.
सिलिंडर हजाराच्या घरात
गॅस सिलिंडरने स्वयंपाकघराच्या बजेटच्या अक्षरश: चिंध्या उडाल्या आहेत. यावर्षाच्या सुरुवातीचा दर पाहिला तर ६३० वर असणारा घरगुती गॅस एकदम ९८० वर पोहचला आहे. नऊ महिन्यांत तब्बल साडेतीनशे रुपये वाढ झाल्याने घरगुती खर्चाचा ताळमेळ बिघडला आहे.
प्रतिक्रिया
घर कसं चालवायं ते तुम्हीच सांगा?
कोरोनामुळे हाताला काम नाही, शेतात मजुरी करून घर खर्च चालवतोय, पण दिवसभर राबून मिळणाऱ्या १०० ते १५० रुपयात एक किलो खाद्यतेलदेखील येत नाही, मग उर्वरीत खर्च करायचा कसा, पोराबाळाचं पोट भरायचं कसं हे आता तुम्हीच सांगा.
सविता नलवडे, करनूर
(बातमीतील चौकटी स्वतंत्र देत आहे)