कोल्हापूर : कोरोना होऊन गेल्यानंतर इतर आजारांच्या शस्त्रक्रिया कधी करायच्या, याबाबत अनेक ठिकाणी संभ्रम दिसून येतो. परंतु, तातडीच्या शस्त्रक्रियांच्या बाबतीत कोणतेही निकष नसून, गरज असेल तर ती लगेचच करावी लागणार आहे, यावर डॉक्टरांचे एकमत आहे. रूग्णाच्या जगण्याचा प्रश्न असेल तर अगदी पॉझिटिव्ह रूग्णावरही शस्त्रक्रिया करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.
कोरोना होऊन गेल्यानंतर शक्यतो १४ दिवस कोणत्याही शस्त्रक्रिया करू नयेत, असे सांगितले जाते. कारण रूग्णाला अशक्तपणा आलेला असतो. विविध औषधे आणि इंजेक्शन्समुळे शरिरातील साखरेचे प्रमाण वाढलेले असते, हे यामागचे कारण असते. गरज असेल तर शस्त्रक्रिया टाळता येत नाही, परंतु जर टाळणे शक्य असेल तर ती करणे टाळावे, असे सांगण्यात येते.
चौकट
दीड महिना वाट पहा
कोरोना होऊन गेल्यानंतर शक्यतो दीड महिना कोणतीही अन्य शस्त्रक्रिया करू नये, असा एक समज आहे. मात्र, वैद्यकीय क्षेत्रातून याचा इन्कार करण्यात आला आहे. असे काहीही ठरलेले नाही. जर रूग्णाच्या जीवावर बेतणारा आजार असेल तर त्यासाठी वाट पाहून चालणार नाही. त्यामुळे आजाराचे स्वरूप आणि तीव्रता, रूग्णाच्या जीविताला असणारा धोका याचा विचार करून कोणत्याही निकषाचा विचार न करता योग्य ती काळजी घेऊन शस्त्रक्रिया करण्यास हरकत नाही.
चौकट
इमर्जन्सी शस्त्रक्रिया
शस्त्रक्रियांचे पाच प्रकार पडतात. अर्जंट, इमर्जन्सी, प्लान म्हणजे नियोजित, सेमी इलेक्टिव्ह आणि इलेक्टिव्ह. दोन ते आठ तासांमध्ये जी शस्त्रक्रिया करावी लागते ती अर्जंट मानली जाते. रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी ती आवश्यक असते. असेच इमर्जन्सी शस्त्रक्रियेमध्ये होते. २४ तासांत ही शस्त्रक्रिया करणे आवश्यक असते. त्यामुळे कोरोना होऊन गेल्यानंतरची रूग्णाची स्थिती कशी आहे, याचा फार विचार न करता आवश्यक ती काळजी घेऊन शस्त्रक्रिया करावी लागते. यामध्ये हृदयविकाराचा झटका आलेले, हृदयाला छिद्र पडलेले, आतड्यांना गाठ बसलेल्या अशांच्या शस्त्रक्रियांचा समावेश होतो.
चौकट
प्लान शस्त्रक्रिया
ज्या शस्त्रक्रिया तातडीने केल्याच पाहिजेत, अशी परिस्थिती नसते अशा शस्त्रक्रिया या गटात मोडतात. हार्निया, हृदयविकाराचा धक्का न आलेल्या रूग्णाची ॲन्जिओप्लास्टी, कान, नाक, घशाशी संबंधित शस्त्रक्रियांचा यामध्ये समावेश होतो. या शस्त्रक्रियांबाबत नेहमीच काळजी घ्यावी लागते.
तक्ता
१ कोरोनाचे एकूण रूग्ण २,०५,४१६
२ बरे झालेले रूग्ण १,९८,७०७
३ सध्या उपचार घेत असलेले रूग्ण ९७१
४ कोरोनाचे बळी ५,७३८
कोट
उपजिल्हा रूग्णालये आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये शासन निर्देशानुसार, शस्त्रक्रिया करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना होऊन त्यातून बरे झालेल्या नागरिकांची वैद्यकीय स्थिती आणि गरज पाहून शस्त्रक्रिया करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
- डॉ. अनिल माळी, जिल्हा शल्य चिकित्सक
१५०९२०२१ कोल ११७१ डमी