लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शेतकऱ्यांना आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी विमा योजना आणली. मात्र, त्यातील जाचक अटी आणि शेतकऱ्यांच्या आकलनशक्तीच्या पलीकडील सर्व गोष्टींचा त्यात समावेश केल्याने शेतकऱ्यांवर ‘भीक नको; पण कुत्रं आवर’ म्हणण्याची वेळ आली आहे. मात्र, कृषी विभागाने विमा कंपन्यांच्या मनमानीला ब्रेक लावला असून, नुकसानीनंतर ऑनलाइन तक्रारीऐवजी आता सहा पर्याय शेतकऱ्यांना खुले करून दिले असून, ते ऑफलाइनही तक्रार करू शकतात.
अतिवृष्टीसह इतर नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर त्याने विमा कंपन्यांकडे ऑनलाइन माहिती भरून भरपाईची मागणी करायची होती. शेतकऱ्यांना ऑनलाइनबाबत फारशी माहिती नसल्याने अनेक वेळा चुकीची माहिती भरल्याने त्यांना लाभ होत नाही. त्यामुळे शेतकरी कंगाल आणि विमा कंपन्या मालामाल अशीच परिस्थिती दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात पाहावयास मिळते. यासाठी कृषी विभागाने त्यात बदल करून शेतकऱ्यांना सहा पर्याय दिल्याने दिलासा मिळाला आहे.
आधी काय होते पर्याय...
१) योजनेत सहभागी शेतकऱ्यांनी घटना घडल्यानंतर ४८ तासांच्या आत नुकसानीची सूचना द्यायची. यामध्ये दिनांक, वेळ, नुकसानीची कारणे, प्रकार, प्रमाण, सर्व्हे नंबरसह विमा कंपनीकडे ऑनलाइन कळवावे लागत होते.
२) याशिवाय संबंधित बँक, कृषी किंवा महसूल विभाग अथवा टोल फ्री क्रमांकावरही माहिती देण्याची साेय होती.
हे आहेत सहा पर्याय...
१) शेतकऱ्यांनी क्रॉप इन्शुरन्स ॲपच्या माध्यमातून झालेल्या नुकसानीची माहिती स्वत: भरायची आहे. ही माहिती भरल्यानंतर अधिकारी व कर्मचारी पंचनाम्यासाठी बांधावर येणार आहेत.
२) तालुक्याच्या ठिकाणी विमा कंपनीचे कार्यालय असेल तर शेतकरी या कार्यालयात ऑफलाइन तक्रार करू शकतात.
३) नुकसानीची तक्रार शेतकऱ्यांना कृषी कार्यालयातही नोंदविता येणार आहे. संबंधित मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा अर्ज द्यावा लागणार आहे.
४) पीक विमा कंपनीच्या मेल आयडीवरदेखील तक्रार करता येणार आहे.
५) ज्या बँकांमध्ये शेतकऱ्यांनी आपला विम्याचा हप्ता भरलेला आहे त्या बँकेच्या शाखेतसुद्धा शेतकऱ्यांना तक्रारीचा अर्ज करता येऊ शकतो.
६) टोल फ्री क्रमांकावरही माहिती देण्याची सोय.
कोट-
मुळात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देता कशी येणार नाही, हेच विमा कंपन्या पाहतात. कृषी विभागाने माहिती देण्याचे पर्याय वाढविले, हे चांगले झाले. त्याचबरोबर विमा कंपन्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करावे.
- संदीप पाटील (शेतकरी, आमजाई व्हरवडे)
(महापुराने नुकसान झालेले उसाचे पीक फोटो-१५०९२०२१-कोल-शेती) (छाया- नसीर अत्तार)