कोल्हापूर : सणवार, आनंदाच्या क्षणी आता तोंड गोड करणेदेखील परवडण्याच्या पलीकडे गेल्याचे दिसत आहे. २० टक्क्यांहून अधिक वाढलेल्या दरामुळे गोड मिठाई खरेदी करताना खिसा रिकामा होण्याची वेळ आली आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मिठाईच्या दरात किलोमागे ३० ते ५० रुपयांची वाढ झाली आहे. ऐन गणेशोत्सवात तर वाढलेल्या दरानेच मिठाई खरेदी करावी लागल्याने खर्चाचा आकडा वाढतच गेला. गणेशोत्सवात आरतीला जाताना एकमेकांच्या घरी मिठाई घेऊन जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पण दर पाहून बजेट बघण्याची वेळ आली. आजच्या घडीला कोणतीही मिठाई पावकिलोला सव्वाशे रुपयांच्या खाली नाही. त्यामुळे एकूणच ग्राहकांना हौसेला मुरड घालावी लागली आहे.
म्हणून वाढले दर...
खाद्यतेलाचे दर गेल्या सहा महिन्यांत दीड पटीने वाढले. गॅसही १८०० रुपयांवर गेला. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतुकीच्या भाड्यात ३० टक्क्यांनी वाढ झाली. साखर ८ रुपयांनी, तर दूध ६ रुपयांनी वाढले. रवा, मैदा, चनाडाळ यांच्या दरातही किलोमागे २० ते ३० रुपयांनी वाढ झाली. या सर्वांचा परिणाम मिठाईच्या दरवाढीत झाला आहे.
दरावर नियंत्रण कोणाचे?
दूध, साखरेसह मिठाईला लागणाऱ्या इतर कच्च्या मालाचे दर शासन निश्चित करते; पण तयार झालेल्या मिठाईच्या दरावर मात्र कोणाचेही नियंत्रण नाही. मिठाईवाला ठरवेल तोच दर असतो. यावर एमआरपीही नसल्याने मिठाईवाला सांगेल तोच दर ग्राहकांना मुकाट्याने द्यावाही लागतो.
मिठाईचे दर (किलोमध्ये)
मोदक ४५० ते ७००
गुलाबजाम ६००
जिलेबी २००
बर्फी ५००
बुंदी २००
पेढे ४००
लाडू ३०० ते ६००
प्रतिक्रिया
गॅस, तेलाच्या दरवाढीमुळे मिठाई तयार करण्याचे बजेट वाढले आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवरही परिणाम झाला आहे. जागेचे भाडे, कामगारांचे पगार आणि वाढत्या महागाईमुळे नाईलाजास्तव २० ते ३० रुपयांची किलोमागे वाढ करावी लागली आहे.
राजू बालन खंडेलबत, मिठाई विक्रेते
प्रतिक्रिया
गोडधोड घरात करायचे म्हटले तरी त्याला लागणारा वेळ पाहता, आम्ही तयार खरेदीलाच प्राधान्य देतो. पण आता स्वीटमार्टच्या दुकानात गेलो, तर पूर्वी ज्या रकमेत दोन किलो मिठाई यायची, तिथे आता दीड किलोवरच समाधान मानावे लागत आहे. दर वाढल्यामुळे जिभेचे चोचले पुरवण्यावर काहीशा मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे फारच आवश्यकता असेल तरच मिठाई खरेदी करतो.
सुहासी कांबळे, ग्राहक