भीमगोंडा देसाई : कोरोना काळात बहुतांशी डॉक्टरांनी स्वत:च्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केले आहे. कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान करावी लागणारी धावपळ आणि कामाच्या व्यापामुळे येथील सीपीआर रुग्णालयातील अनेक डॉक्टरांचे वजन घटले आहे.
गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार होत आहे. आता दुसरी लाट आली आहे. यामुळे सीपीआरसह सर्वच शासकीय आणि खासगी रुग्णालयांवर अतिरिक्त ताण वाढला आहे. खासगी दवाखान्यातील उपचाराचा खर्च आवाक्याबाहेर गेल्याने बाधित रुग्ण सरकारी रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सीपीआर रुग्णालय कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
महिन्यापासून कोरोनाबाधितांची संख्या पंधराशेवर आहे. यामुळे सीपीआर रुग्णालयातील व्हेंटिलेटर बेड फुल्ल झाले आहेत. इतर रुग्णांची संख्या वाढते आहे. उपलब्ध मनुष्यबळावर त्यांच्यावर उपचार करताना डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर ताण येत आहे. त्यांना धावपळ करावी लागत आहे. यामुळे त्यांचे वजन कमी झाल्याचे दिसून येत आहे. अनेक डॉक्टर आहार आणि व्यायामावर लक्ष केंद्रित करून फिट राहण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आकडे बोलतात
सीपीआर रुग्णालय : १
डॉक्टरांची संख्या : २६३
आरोग्य कर्मचारी : ८८९
आहाराची घेतात काळजी
१ वैद्यकीय सेवेचा वाढलेला ताण आणि धावपळीमुळे वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांनी जेवणात तळलेले पदार्थ खाण्याचे पूर्णत: बंद केले. जेवणाशिवाय मध्येमध्ये खाण्यावर बंधो घालून घेतली.
२ फळे, पालेभाजा खाण्यावर भर दिला. जास्तीत जास्त पोटॅशियम आणि मॅग्नेशियम मिळेल असा आहार घेतला जातो. स्वयंपाकात कडधान्यांचा वापर वाढविण्यात आला.
३ नियमित सात तास झोप घेतली जाते. लॉकडाऊनमुळे घरी राहिले तरी सकाळी ४० मिनिटे जॉगिंग, २० मिनिटे प्राणायम व इतर योगासने करण्यात येतात.
कोट
कोरोना संसर्गामुळे रुग्णसंख्या वाढते आहे. परिणामी सीपीआरमधील डॉक्टरांवर कामाचा अतिरिक्त ताण वाढला आहे. धावपळही करावी लागत आहे. अशा काळात मी आरोग्य चांगले राहण्याला प्राधान्य देत आहे. यामुळे माझे सहा किलो वजन घटले आहे.
अक्षय बाफना, डॉक्टर, सीपीआर
कोरोनामुळे वैद्यकीय सेवेचा ताण वाढल्याने जीवनशैलीत बदल केला आहे. व्यायाम आणि आहारावर लक्ष देत आहे. आहारात गोड पदार्थ टाळले आहेत. मांसाहार जेवण कमी केले. रोज सकाळी एक तास चालतो. व्यायामात खंड पडू दिला नाही.
डॉ. अजित लोकरे, डॉक्टर, सीपीआर
कोरानामुळे धावपळ वाढल्याने वजन कमी झाले आहे. शिवाय वजन घटविण्यासाठी आणि आरोग्य चांगले राहण्यासाठी खाण्यावर नियंत्रण ठेवले. नियमित व्यायाम करतो. पुरेशा प्रमाणात झोप घेतली जाते. यामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत आहे.
डॉ. फारुक देसाई, जिल्हा माता, बालसंगोपन अधिकारी