कोल्हापूर : म्युकरमायकोसिस आजार हा काही नवीन नाही. तो संसर्गजन्यसुध्दा नाही. पूर्वीपासूनच त्याचे अस्तित्व आहे. प्रत्येक व्यक्तीच्या नाकात बुरशी (फंगस) असते. जेंव्हा व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमी होते, तेव्हा हा आजार डोकं वर काढतो. म्हणून डाेळ्यांना काही त्रास जाणवायला लागला की तत्काळ तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेतले तर घाबरण्याचे अजिबात कारण नाही, असा दावा कोल्हापुरातील नेत्ररोग तज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढलेला आहे, रोज हजारो रुग्ण वाढत आहेत. सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. अशातच म्युकरमायकोसिस आजारसुध्दा चर्चेत आला आहे. या आजाराचा आघात डोळ्यांवर होताना दिसत आहे. कोरोना झालेल्यांना हा आजार होतो का, एकमेकांच्या संपर्काने तो होता का, या आजाराने डाेळे जातील का अशा अनेक शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील नेत्ररोगतज्ज्ञांशी संवाद साधला असता पुरेशी खबरदारी, योग्य निदान आणि तत्काळ उपचार सुरू झाले तर हा आजार माणसांचं काहीही बिघडू शकत नाही, अशी माहिती समोर आली.
म्युकरमायकोसिसचे अस्तित्व पूर्वीपासूनच आहे. प्रत्येक व्यक्तींच्या नाकात त्याची बुरशी (फंगस) असते. जेव्हा व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, तेव्हा हा आजार डोकं वर काढतो बळावतो. यापूर्वी मधुमेही रुग्णांना हा आजार होत होता. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढले की रोगप्रतिकारशक्ती कमी होते तेव्हाच म्युकरमायकोसिस आजार व्हायचा. आता ज्यांना कोविड होऊन गेला आहे, त्यांना हा आजार होण्याचे प्रमाण वाढले आहे. पोस्ट कोविड रुग्णांची शरीरात साखर वाढत आहे. म्हणूनच कोरोनातून मुक्त झाल्यामुळे आनंदात आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शरीरातील बदलाकडे अन्य दुखण्यांकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे.
-म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे -
सुरुवातील एक डोळा दुखतो, सुजतो, एका नाकपुडीतून रक्त किंवा काळपट द्रव येण्यास सुरुवात होतो. काही दिवसांनी त्या डोळ्यांनी दिसायचं कमी होते. ही म्युकरमायकोसिसची प्राथमिक लक्षणे आहेत.
-ही घ्या काळजी-
या आजाराची प्राथमिक लक्षणे आढळून आली की, तत्काळ नेत्ररोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. थोडा जरी त्रास जाणवायला लागला तरी डॉक्टरांकडे जावे. लवकर निदान होईल याकडे लक्ष द्यावे. सुरुवातीलाच उपचार सुरू झाले, तर योग्य उपचाराद्वारे डोळा वाचवू शकतो.
डॉक्टर काय म्हणतात -
१. या आजारावर नक्की कोणतं औषध द्यायचं हे माहीत आहे. त्यामुळे लवकर निदान आणि उपचार होणे खूप महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झेपेल तेवढा व्यायाम, सकस आहार, योग्य विश्रांती, तज्ज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. आजाराविषयी मनातील भीती काढून टाकण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
डॉ. अतुल जोगळेकर.
२. प्रत्येकाच्या नाकात फंगस असते. शरीरातील रोग प्रतिकारशक्ती कमी झाली की आजार बळावतो. हा आजार केवळ कोविड रुग्णांनाच नाही तर नॉनकोविड तसेच मधुमेही रुग्णांनाही होतो. उपचाराची पद्धत निश्चित असल्याने जेवढे लवकर निदान होईल तेवढे हिताचे आहे. योग्य उपचारामुळे आजार पूर्णपणे बरा होतो.
डॉ. गायत्री होशिंग.
औषधाचा पुरवठा मागणीप्रमाणे -
कोल्हापूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे ५५ रुग्ण उपचार घेत आहेत. सीपीआर रुग्णालयाकडून मागणी प्रमाणे औषध पुरवठा तसेच लिपोसोमल एम्फोटिसिरीन बी या इंजेक्शनचा पुरवठा मागणीप्रमाणे केला जात आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्याकरिता त्याची नोंदणी करावी लागते.