कोल्हापूर : लस पुरवठ्याबाबतचा खेळखंडोबा पाहता नव्या वर्षात म्हणजेच २०२२ च्या सुरुवातीला जरी लस मिळाली तरी खूप झाले असे म्हणण्याजोगी परिस्थिती सध्या पाहवयास मिळत आहे. कोल्हापूर जिल्हा लसीकरणामध्ये अव्वल असला तरी लस नसल्याने सध्या हातावर हात बांधून बसण्यापलीकडे फारसे काही हातात राहिले नाही हे वास्तव आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांनी जरी डिसेंबरअखेर लसीकरण पूर्ण होईल, असे सांगितले असले तरी त्यावर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारी २०२१ पासून लसीकरणास सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य क्षेत्रातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात आले. मात्र याच क्षेत्रातील अनेकांनी लस घेण्यास सुरुवातीच्या काळात टाळाटाळ केली. यामध्ये सीपीआरमधीलही अनेकजण सामील होते. अखेर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना यासाठी बैठक घ्यावी लागली आणि लसीकरणाला चालना द्यावी लागली. याचा असा परिणाम झाला की जादा आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतल्याने १११ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे.
यानंतर फ्रंट वर्कर आणि पंचायत राज व्यवस्थेतील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले. महसूल, पोलीस आणि जिल्हा परिषद, पंचायत समितीमधील जे कोरोना कर्तव्यात आहेत अशांनी लस घ्यावी, असे अपेक्षित होते. मात्र या विभागातील अनेकांनी लस घेतल्याने उद्दिष्टापेक्षा तब्बल १३६ टक्के जादा लसीकरण झाले. यानतंर ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू करण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत पात्र एकूण नागरिकांपैकी ५३ टक्केंना पहिला डोस देण्यात आला आहे. एकूणच पहिल्या डोसचे जिल्ह्यात केवळ २७ टक्के काम झाले आहे तरीही जिल्हा राज्यात अव्वल आहे.
चौकट
कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख
लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या ३४ लाख ४३ हजार ८१७
पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या ९ लाख ३५ हजार ६४३/ २७ टक्के काम
दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांची संख्या २ लाख ३० हजार ३९३/ ७ टक्के काम
१८ पेक्षा कमी वयाची लोकसंख्या १३ लाख ३३ हजार २२९
चौकट
पुढचे वर्ष उजाडणार
गेल्या साडेचार महिन्यांपासून कोल्हापूर जिल्ह्यात लसीकरण सुरू आहेत. तेव्हा कुठे २७ टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर ७ टक्के लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. गेले महिनाभर फारशी लस मिळालेलीच नाही. त्यामुळे याच गतीने जर लस मिळणार असेल तर निश्चितच लसमोहीम पूर्ण होण्यासाठी २०२२ उजाडणार आहे.
चौकट
आधीची लसीकरण केंद्रे ११
सध्याची केंद्रे २५०
कोट
कोल्हापूर जिल्ह्यात सुरुवातीपासून लसीकरण वेगाने सुरू होते. लस वाया जाण्याच्या प्रमाणावरही खूप नियंत्रण आणले गेले. उपलब्ध लसीमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लस देण्याची कामगिरी कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली आहे. यापुढच्या काळात लस रोज मिळत गेल्यास तातडीने लसीकरण करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे.
- डॉ. फारूक देसाई
जिल्हा समन्वयक, लसीकरण मोहीम