लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तरुण आणि प्रौढांसाठी अधिक घातक ठरल्याचे जिल्ह्यातील दोन्ही कोरोना लाटांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या पहिल्या लाटेपेक्षा तब्बल २१ ते ५० या वयोगटातील १४ हजार जादा नागरिकांना दुसऱ्या लाटेमध्ये कोराेनाची लागण झाली आहे तर मृत्यूही तिपट्टीने झाले आहेत.
गतवर्षी मार्चपासून महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळू लागले. मार्चअखेरीस कोल्हापूरमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. सर्वसाधारणपणे मार्च २०२० ते डिसेंबर २०२० ही कोरोनाची पहिली लाट मानण्यात येते, तर १ जानेवारी २०२१ पासून दुसरी लाट सुरू झाली आहे. पहिल्या लाटेतील दहा महिने आणि दुसऱ्या लाटेतील मेपर्यंतचे पाच महिने यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर याबाबी स्पष्ट झाल्या आहेत.
पहिल्या लाटेवेळी कोरोना विषाणूच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील विषाणू अधिक तीव्र स्वरूपाचा असल्याने मृतांचाही आकडा वाढला आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेवेळी ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली. रेमडेसिविरचा तुटवडाही भासला आणि आता नव्याने म्युकरमायकोसिसचे रुग्णही वाढू लागले आहेत.
त्यातही दुसऱ्या लाटेमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात फारसे रुग्ण आढळले नाहीत. मात्र, एप्रिलमध्ये एकदम रुग्णवाढीला सुरुवात झाली आणि केवळ एका मे महिन्यात तब्बल ५० हजार हून अधिक कोरोनाचे रुग्ण नोंदवण्यात आले.
१ कोरोना पॉझिटिव्ह
वयोगट पहिली लाट दुसरी लाट
१ वर्ष ४३ ३२
१ ते १० वर्षे १८८८ २५६८
११ ते २० वर्षे ३४८८ ५४९०
२१ ते ५० २६३१७ ४०३२७
५१ ते ७० १४२१८ १५३६१
७१ वर्षांवरील ३५३६ ३८३७
एकूण ४९४९० ६७६१५
२ कोरोना मृत्यू
वयोगट पहिली लाट दुसरी लाट
० ते १५ ० १
१५ ते २९ २६ १५
३० ते ४४ १३२ १७५
४५ ते ५९ ४४२ ४१४
६० ते ७५ ९६१ ६३२
७५ च्या पुढे २७३ १८६
एकूण १८३४ १४२३
चौकट
पहिली लाट दुसरी लाट
पॉझिटिव्ह ४९ हजार ५२७ ८१ हजार ३१५ चौकट
तिसऱ्या लाटेची तयारी सुरू
तिसरी लाट येण्याआधीच प्रशासकीय आणि आरोग्य पातळीवर पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये किमान २५ आणि जास्तीत जास्त १०० बेड हे लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच त्यातील दहा टक्के बेड हे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड असावेत, असेही नियोजन करण्यात येत आहे. त्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात असून येथील जिल्हा रुग्णालय सीपीआर येथे ऑक्सिजन सुविधा वाढवण्यात येत आहे.
कोट
तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सर्व आरोग्य संस्थांची तयारी सुरू आहे. कोविड, नॉन कोविड मुला-मुलींसाठी स्वतंत्र वार्ड, आयसीयुू उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या संघटनांशी चर्चा झाली असून, त्यांचेही या कामी सहकार्य घेतले जात आहे. सर्व प्रकारच्या बेडचे नियोजन करण्यात येत आहे.
डॉ. उषादेवी कुंभार, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर