लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यापूर्वी रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे होते, कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये अपघाताचे व त्यातील मृत्यूचे प्रमाण घसरले. पण कोरोना कालावधीत संसर्गाने मृत्यूची संख्या वाढली. दीड वर्षात प्रथम कोरोना महामारीने व नंतर रस्ते अपघातातील मृत्यू अधिक आहेत. सुमारे पाच हजारांहून अधिक जणांचे मृ्त्यू झाले. त्यामुळे मरण स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात अपघात प्रवण क्षेत्रासह विविध ठिकाणी रस्ते अपघातात मोठ्या संख्येने बळी गेले. जिल्ह्यात कोरोनाच्या शिरकावापूर्वी २०१९ मध्ये लहान-मोठे १०२८ अपघात घडले. ३४९ प्राणघातक अपघात ठरले. २०२० मार्चनंतर कोरोनाचा जिल्ह्यात प्रवेश झाला अन् लॉकडाऊन झाले. पुढे उर्वरित कालावधीमध्ये रस्त्यावर वाहतुकीची कोंडी वाढली. २०२० मध्ये एकूण १२९२ अपघातांपैकी ३४९ हे जीवघेणे ठरले. दुसऱ्या बाजूने कोरोनाचे साडेचार हजारांवर बळी ठरले. रस्ते अपघातात ५११ जणांचे बळी गेले. कोरोना कालावधीत मृत्यूचे प्रमाण हे मरण स्वस्त झाल्याचे दिसते.
-वर्षे -अपघात - जखमी - मृत्यू
-२०१९ - १०२८ - ८२३ - ३८०
- २०२० - १२९२ - ९७८ - ३३०
- २०२१
(मे पर्यंत) -६१६ - ५०७ - १८१
लॉकडाऊनमध्ये अपघात कमी, पण ....
दीड वर्षात लॉकडाऊनमध्ये रस्ते अपघात घटले, अपघाती मृत्यूही घटले. २०२० मध्ये ३३० जणांचे, तर मे २०२१ पर्यंत १८१ जणांचे प्राणघातक अपघातात मृत्यू झाले. २०२० मध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेत १७०५ तर २०२१ च्या दुसऱ्या लाटेत २८७९ असे एकूण साडेचार हजारांवर बळी गेले.
पायी चालणाऱ्या व्यक्तींनाही धोका
गेल्या दीड वर्षात पादचारी व्यक्तींनाही धोका वाढला आहे. या कालावधीत जिल्ह्यात तब्बल ३१ जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये सर्वाधिक तरुण
अपघाती मृत्यूमध्ये सर्वाधिक तरुण वर्गाचा मोठा समावेश आहे. साधारण २० ते ३० या वयोगटातील विशेषत; दुचाकीचालक तरुणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची नोंद आहे.
येथे वाहने हळू चालवा...
जिल्ह्यात ८५ ठिकाणी ‘अपघात प्रवणक्षेत्र’ (ब्लॅक स्पॉट) आहेत. तेथे लहान-मोठे अपघात घडतात. त्यापैकी राष्ट्रीय महामार्गावर ९ तर कोल्हापूर शहरात १३ तर उर्वरित ब्लॅक स्पॉट हे तालुकास्तरावर आहेत. येथे नेहमी मोठ्या संख्येने अपघात होतात, येथे वाहने हळू चालवण्याचे फलक झळकतात.
वेळ मौल्यवान, पण जीवन अमूल्य
कोट..
‘ अंधार पडण्यापूर्वी घरी पोहोचायचे म्हणून वेगाने दुचाकी चालवली, अतिग्रेनजीक ट्रकला ओव्हरटेक करताना समोरुन आलेल्या मोटारीने मला उडवले, मला गंभीर दुखापत झाली, सुदैवाने बचावलो. अतिघाई केल्याने दुर्घटना घडल्याचे लक्षात आले.’ - संदीप रंगापुरे, इचलकरंजी.
कोट..
‘मी दुचाकीवरुन संभाजीनगर स्टँडकडून मुख्य रस्त्यावर प्रवेशताना कळंबाकडून जाणाऱ्या जीपची जोराची धडक लागली. माझ्याच घाईगडबडीमुळे दुर्घटना घडली. त्यात मी बेशुद्ध पडलो, त्यानंतर माझा पाय निकामा झाल्याचे रुग्णालयात शुद्धीवर आल्यावर लक्षात आले.- अतीश माळी, मंगळवार पेठ, कोल्हापूर