लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : भूमाफियांचा प्रश्न सध्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. भूखंड हडप करणा-या भूमाफियांबाबत कोल्हापूर जिल्ह्यात ??????????? प्रमाण अगदीच नगण्य असल्याने त्याबाबत तक्रारीचे प्रमाणही कमी आहे. अशा भूखंड हडप करणा-या माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी अगर त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यात पोलीस दलातर्फे अद्यापतरी ‘लॅण्ड डिस्प्यूटस’ असा स्वतंत्र सेल निर्माण केलेला नाही. जिल्ह्यात भावाभावांच्यात अगर वारसा जमिनीच्या वाटणीचे वाद ग्रामीण भागात अधिक आहेत.
महाराष्ट्रात भूमाफियांंचा प्रश्न चर्चीला जात आहे. विशेषत: विदर्भ-मराठा भागात हा भूखंड माफियांचा प्रश्न चव्हाट्यावर येत आहे. भूखंड हडप करणारी टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘लॅड डिस्प्यूट्स सेल’ची निर्मिती केली जाते. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्तांच्या नियंत्रणाखाली हा सेल कार्यरत असतो. कोल्हापूर जिल्ह्यात तसे भूखंडमाफियांचे प्रमाण नगण्य असल्याने असा स्वतंत्र सेल जिल्हा पोलीस दलामार्फत निर्माण केलेला नाही.
जिल्ह्यात सावकारीतून पिळवणुकीचे प्रमाण मोठे आहे. त्याशिवाय ग्रामीण भागात भावाभावात जमिनीच्या वाटणीवरून वाद, भाऊ-बहिणीत घरजमीन वाटणीवरून वाद, शेतीच्या बांधावरून वादाचे प्रमाण मोठे आहे. त्याबाबतच्या तक्रारी त्या-त्या हद्दीतील पोलीस ठाण्याकडे दाखल होतात. त्याप्रमाणात त्या निर्गतही होतात, अगर दिवाणी न्यायालयात जातात.
चंदगडमध्ये भूखंड हडपचा प्रकार
अलीकडच्या काळात चंदगड तालुक्यात मोठा भूखंड काहींनी बोगस कागदपत्रे तसेच बनावट व्यक्ती उभी करून हडपण्याचा प्रयत्न झाला, त्याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या. एका नामवंत डॉक्टराचाही सहभागाची चर्चा आहे. हा प्रकार चौकशीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गुन्हे विभागाकडे आहे. याप्रकरणात आतापर्यंत सात ते आठ जण भूखंड एजंट, काही सरकारी अधिकारीही संशयावरून अटक केली आहेत. त्याची सखोलपणे चौकशी सुरू आहे.
जमीन, प्लॉट बळकवण्याचे प्रकार
कोल्हापूर शहराच्या पाचगाव, राजेंद्रनगर या उपनगरात काही ठिकाणी गुंडांना हाताशी धरून जमिनी, प्लॉट बळकावण्याचे घडत आहेत. पण त्यामध्ये काही मोजक्यात तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. अनेक जमीनमालक गुंडाच्या भीतीने पोलिसांकडे तक्रारीसाठी पुढेच येत नाहीत. ग्रामीण भागातील जमीन वादाच्या तक्रारी त्या-त्या हद्दीतील पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत.
कोट...
जिल्ह्यात भूमाफियांचे प्रमाण नगण्य त्यासाठी स्वतंत्र असा कोणताही सेल निर्माण केलेला नाही. भूखंड हडप करण्याचे एखादे मोठे प्रकरण अगर त्यातील मोठे अर्थिक फसवणुकीचे व्यवहार असेल तर त्याची आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सखोलपणे चौकशी केली जाते. - शैलेश बलकवडे, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर जिल्हा.