राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मोबाईल क्रांती झाल्याचा आपण डांगाेरा पिटत असलो तर त्याचे दुष्परिणामही गंभीर आहेत. मोबाईलने माणसाची मेमरी घालविली असून आपला सोडून कुटुंबातील इतरांचा क्रमांकही आपणास लक्षात नसतो. स्वत:चे एकापेक्षा अधिक क्रमांक असले तरी तेही पाठ नसतात. जे मोबाईल वापरत नाहीत, त्यांची स्मरणशक्ती तुलनेत अधिक चांगली असल्याचे दिसते.
काळानुरूप मोबाईलचा वापर करणे गरजेचे बनले असले तरी माणूस खूप त्याच्या आहारी गेला आहे. मूळ काम करताना आणि झाल्यानंतरही त्याने स्वत:ला मोबाईलमध्ये गुंतवून घेतल्याने त्याचा परिणाम माणसाच्या स्मरणशक्तीवर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
असे का होते?
एखाद्या वस्तूचा वापर आपण कसा व किती वेळा करतो, त्यावर त्याचा टिकाऊपणा अवलंबून असतो. त्याप्रमाणे माणसाच्या मेंदूचेही आहे. ज्यांचे काम आयुष्यभर चाकोरेबद्ध राहिले आहे व नवीन काहीच करण्याचा प्रयत्न नसतो, अशा माणसांना विस्मृतीचा त्रास लवकर सुरू होतो. त्यात वय वाढेल तशी विस्मृतीचे प्रमाण वाढत जाते. आपले काम संपले की लगेच मोबाईलमध्ये डोके खुपसून बसतो. मोबाईलमध्येही आपल्या बुद्धीला चालना मिळेल असे नवीन काही करत नाही. जे आहे ते पाहत बसणे, एवढेच करत असतो.
हे टाळण्यासाठी काय करावे ?
मानवी मेंदू हा इतरांच्या तुलनेत वेगवान असतो. त्याला नेहमी नवनवीन काम दिले की तो त्याची गती कायम राहते. आपले नियमित कामाबरोबरच इतर छंद जोपासणे गरजेचे आहे. मोकळ्या वेळेतील जास्तीत जास्त काळ हा मेंदूला चालना देणारे काम केले तर, विस्मृतीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
नातवापेक्षा अजोबाची स्मरणशक्ती अधिक
घरातील वयोवृद्ध मंडळी ७०-८० वर्षांच्या पूर्वीच्या आठवणी जशा आहेत तशा सांगतात. त्या उलट कुटुंबातील तरुणांची अवस्था आहे. रात्री झोपताना पैशाचे पाकीट कोठे ठेवले, हे दुसऱ्या दिवशी आठवत नाही.
पूर्वीच्या काळी आपल्या नियमित कामाशिवाय खूप वेळ मिळायचा, आता नवतंत्रज्ञानाच्या नावाखाली सगळेजण मोबाईलमध्ये अडकून पडल्याने कुटुंबातील संवाद कमी झाला आहे. तेच तेच चाकोरेबद्ध कामामुळे मेंदूची क्षमताही काहीसी कमी होते. यासाठी मेंदूला चालना देण्यासाठी नवनवीन काहीतरी करण्याच्या मागे लागले पाहिजे.
- डॉ. पवन खोत, मानसोपचारतज्ज्ञ
मी मोबाईल फार कमी वापरतो, सतत वेगळ्या कामात गुंतवून घेतल्याने वयाच्या ६६ व्या वर्षीही मला अनेक गोष्टींचे चटकन् स्मरण होते. कुटुंबातील प्रत्येकाने मोबाईलचा वापर योग्य पद्धतीने केला पाहिजे. अन्यथा आणखी काही वर्षांनी माणूस स्वत:लाच विसरून जाण्याची भीती आहे.
- नामदेव कांबळे, सोनाळी, ता. करवीर