कोल्हापूर : नोकरी लावतो, रोजगार मिळवून देतो म्हणून बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्यांनी आता नवे डिजिटल माध्यमही आत्मसात केले आहे. फसवणाऱ्यांच्या तुलनेत नागरिक तितकेसे सजग नसल्याने ऑनलाइन फसवणुकीचे पेवच फुटले आहे. फसवणूक टाळण्यासाठी शासनाने सायबर सेलही सक्रिय केला आहे; पण दुर्दैव असे की एकही नागरिक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही. त्यामुळे फसवणाऱ्यांचे फावले असून आता नागरिकांचेच प्रबोधन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
नोकरी लावतो, उद्योग व्यवसाय उभारून देतो अशा बाता मारून रोख रक्कम उचलणाऱ्या भामट्यांची समाजात कमी नाही. या प्रकारच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल होतात, त्यावर गुन्हे दाखलही होतात, शिक्षाही होतात. अलीकडे डिजिटल माध्यमांचा सुकाळ झाल्यापासून फसवणुकीचे स्वरूपही बदलून गेले आहे. नोकरी देण्याची ऑफर देणारी वेबसाइट तयार करून त्याद्वारे बेरोजगारांना जाळ्यात ओढले जात आहे. अलीकडील तरुणाई डिजिटल माध्यमात पारंगत असूनदेखील ती या भूलभूलय्यात वेगाने अडकत आहे.
चौकट
काय खबरदारी घ्यावी?
दिलेला वेब पत्ता यूआरएल काळजीपूर्वक पाहा.
सुरक्षित इंटरनेट कनेक्शन तपासा
पेमेंट करण्याचे सर्व पर्याय बघून घ्या
चाैकट
जबाबदार बना, जागरूक राहा
केंद्र सरकारच्या सायबर क्राइम या वेबसाइटवर आपली तक्रार ऑनलाइन नोंदवता येते. ११५२६० या हेल्पलाइन नंबरवर देखील मदत मागू शकता. कोल्हापूर जिल्ह्यात तक्रार करण्यासाठी सायबर सेलने ८४१२८४११०० हा हेल्पलाइन नंबर दिला आहे.
प्रतिक्रिया
बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे नोकरी व उद्योग व्यवसायाची माहिती दिली जाते, हे खरे आहे. त्यात फसवणूक होणाऱ्यांची संख्याही जास्त आहे; पण एकही तक्रार पोलीस ठाण्यात गेल्या वर्षभरात दाखल झालेली नाही. एक तक्रार आली होती; पण ती दिल्ली, गोवा यांच्याशी संबंधित असल्याने त्याचा कोणताही तपास कोल्हापुरात झाला नाही.
-श्रीकांत कंकाळ
पोलीस निरीक्षक, सायबर सेल