लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना महामारीच्या विळख्यातून सहीसलामत सुटका झाल्यानंतरही काही जणांना पुढे महिना दीड महिना रुग्णालयातच उपचार घ्यावे लागत आहेत. जिल्ह्यातील खासगी व सरकारी रुग्णालयात असे सुमारे ९५० हून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोना आजारपणात घेतलेल्या औषधांचा शरीरावर विपरीत परिणाम होऊन अनेकांना न्यूमोनिया झाला, काहींची शुगर वाढली, काहींना पुढे दोन महिने ऑक्सिजन द्यावे लागत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा कहर झाला. कोरोनातून वाचण्यासाठी औषधी घेतली, पुढे कोरोना बराही झाला; पण औषधांचे दुष्परिणाम शरीरावर दिसू लागले. ज्याची प्रतिकारशक्ती कमी आहे, त्यांच्यावर हे औषधांचे परिणाम दिसतात. कोरोनानंतर अनेकांना सारी, म्युकर या आजाराने गाठले, काहींना न्यूमोनिया झाला. रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्यामुळे अनेकांची शुगर वाढली, तर काहींना धाप लागणे, थंड हवेचे इन्फेक्शन होऊन सर्दी-खोकला झाला, तर काही रुग्णांना पुढे दोन महिने ऑक्सिजन लावावा लागला.
पोस्ट कोविडचा धोका ४० ते ४५ वयोगटाला
कोविड आजारातून बरे झाले तरीही इतर आजारांनी गाठले. अशी अवस्था विशेषत: ४० ते ४५ वयोगटातील व्यक्तींची झाली. उतरत्या वयातील वयोगटाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना पोस्ट कोविडचा धोका जादा संभवलेला दिसतो. जिल्ह्यात सध्या असे सुमारे ९५० हून अधिक रुग्ण कोरोनानंतरही उपचार घेत आहेत.
कोरोनातून बरा; पण श्वसनाचा त्रास...
औषधोपचारामुळे कोरोनाला हरवले, अहवाल निगेटिव्ह आला, तरीही रुग्णाला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने पुढे उपचार सुरूच ठेवावे लागले. धाप लागणे, थंड वातावरणामुळे सर्दी-खोकला वाढणे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ऑक्सिजन लावावे लागते.
कोरोनातून बरे झालात, घ्या काळजी!
कोरोनातून बरे झाल्यानंतर रुग्णाने दक्षता म्हणून पुढे काही दिवस गरम पाण्याची वाफ घ्यावी, गरम पाण्याच्या गुळण्या कराव्यात, हळद व दूध गरम करून प्यावे, प्रोटिन वाढवणारे पदार्थ खावेत, व्हॅक्सिन घ्यावे, सर्दी-खोकला अगर अंगदुखीची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- कोरोनाचे जिल्ह्यातील एकूण रुग्ण : १,८८,९२२
- बरे झालेले रुग्ण : १,७०,४७९
- सध्या उपचार घेत असलेले रुग्ण : १३,१७९
- बळी गेलेले रुग्ण : ५,२६४
कोट...
कोरोना उपचार करताना घेतलेली औषधी, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन यांचा परिणाम पुढे दिसून येतो. त्यामुळे कोरोना बरा झाला तरीही रुग्णाने योग्य ती काळजी घ्यावी, प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. अंग दुखत असल्यास अगर समस्या गंभीर वाटल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधून उपचार घ्यावेत. - डॉ. व्यंकटेश पोवार, वैद्यकीय अधिकारी (अपघात विभाग), सीपीआर, कोल्हापूर.