कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा स्टार एअरवेज या कंपनीकडून लवकरच सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना आदेश देण्यात येतील, असे केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी बुधवारी सांगितले. खासदार संजय मंडलिक यांनी नवी दिल्लीत त्यांची भेट घेतली व ही विस्कळीत झालेली विमानसेवा सुरू करण्याबाबत विनंती केली. त्यांनी कोल्हापूर-मुंबई व कोल्हापूर-बंगळुरू या दोन्ही सेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले. केंद्र शासनाबरोबर स्टार एअरवेजचा करार झाला असल्याने ही विमानसेवा सुरू करण्याची आमची तयारी आहे. फक्त रन-वेचे काम आम्ही थांबलो असल्याचे स्टार एअरवेज कंपनीच्या वतीने ‘लोकमत’ला सांगण्यात आले.
कोल्हापूरला चांगल्या विमानसेवेची अत्यंत गरज आहे. त्याचाच विचार करून विमानतळ विस्तारीकरणाचे काम सध्या जोरात सुरू आहे. केंद्र शासनाच्या उडाण योजनेतून ट्रुजेट कंपनीकडून कोल्हापूर-मुंबई ही विमानसेवा सुरू होती. परंतु ती गेली सहा महिने बंदच आहे. आठवड्यातून मंगळवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस दुपारी १२.१० वाजता विमान यायचे व १२.३५ ला परत जात असे. परंतु अनेकदा पुरेसे प्रवासी असतानाही कंपनीची काही अडचण आली म्हणून ऐनवेळी विमान रद्द होत असे. त्याचा प्रवाशांना मोठा मनस्ताप होत असे. उडाण योजनेतील विमान कंपनी तीन वर्षे बदलता येत नाही असा एक समज होता; परंतु आता मंत्री शिंदे यांनी विमान कंपनी बदलून घोडावत ग्रुपच्या स्टार एअरवेजकडून ही विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे सांगितले.
कोल्हापूरबद्दल मला विशेष प्रेम असल्याच्या भावना यावेळी त्यांनी व्यक्त केल्या. मुख्य सचिव राजीव बन्सल, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक विज्ञान मुंडे, मार्केटिंग फेडरेशनचे संचालक नंदकिशोर सूर्यवंशी आदी यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूर-अहमदाबाद उद्यापासून..
कोल्हापूर-अहमदाबाद ही विमानसेवा शुक्रवारपासून (दि. ३) सुरू होत असल्याची माहिती खासदार मंडलिक यांनी दिली. मंगळवारीच पालकमंत्री सतेज पाटील यांनीही ट्विट करून ही सेवा सुरू होत असल्याचे जाहीर केले होते. सोमवार आणि शुक्रवार अशी दोन दिवस ही सेवा सुरू राहील. सकाळी ९.५५ वाजता अहमदाबादहून उड्डाण होईल. दुपारी १२ वाजता ते कोल्हापुरात पोहोचेल. दुपारी १२.१५ वाजता टेक ऑफ झालेले विमान २.२५ ला अहमदाबादला पोहोचेल. यामुळे कोल्हापूर-जयपूर, कोल्हापूर-दिल्ली अशी कनेक्टिव्हिटीही मिळू शकेल.