कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्वच व्यापारी, दुकानदारांना व्यवसाय सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने सम-विषम तारखेस किंवा अन्य काही नियम लावून, परवानगी दयावी. किमान सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत तरी सर्व दुकाने उघडण्यास अनुमती दयावी. अशी मागणी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी केली आहे. तसे न केल्यास जिल्ह्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.
लॉकडाऊनमुळे गेल्या दीड वर्षात व्यापारी, दुकानदार यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. फेरीवाल्यांसह कापड दुकानदार, सराफ व्यावसायिक, रेडिमेड गारमेंट विक्रेते, होजिअरीची दुकाने, भांड्यांची दुकाने, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने, हार्डवेअर दुकाने, फर्निचर शोरूम, परफ्यूम आणि अगरबत्तीची दुकाने बंद राहिल्याने प्रचंड अस्वस्थता आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये अनलॉक सुरू झाला असून, चुकीच्या धोरणांमुळे कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यात अडकला आहे. कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्यासाठी हे दुकानदार जबाबदार नाहीत. त्याची कारणे सर्वस्वी वेगळी आहेत. तरीही कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील बहुसंख्य व्यापार्यांना आपली दुकाने, शोरूम बंद ठेवणे बंधनकारक करून, जिल्हा प्रशासनाने एकप्रकारे अन्याय केला आहे. रस्त्यावरील गर्दी वाढण्यास व्यापारी जबाबदार नाहीत.