* प्रशासन, आरोग्य विभाग व इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
जयसिंगपूर : कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मागील वर्षीपेक्षा यावेळेला कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे तालुका प्रशासन व आरोग्य विभागाने तातडीने जयसिंगपूर येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरात गतवर्षी सुरू केलेले कोविड केअर सेंटर तातडीने सुरू करावे तसेच या सेंटरला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी डॉक्टर्सनी मदत करावी, असे आवाहन आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
शिरोळ तालुक्यामधील कोरोनासंदर्भातील सद्य:स्थितीचा आढावा मंत्री यड्रावकर यांनी जयसिंगपूर येथे घेतला. यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे, गटविकास अधिकारी शंकर कवितके, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, डॉ. प्रसाद दातार, डॉ.घोडके उपस्थित होते.
सध्या कुंजवन उदगाव येथे १४ तर आगर येथे ४४ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले आहेत. त्याचबरोबर शिरोळ ग्रामीण रुग्णालय व आगर येथे स्वॅब तपासणी केंद्रे सुरू केली असल्याचे तहसीलदार मोरे व डॉ. दातार यांनी दिली. त्यावर जयसिंगपूर व दत्तवाड या दोन ठिकाणी स्वॅब तपासणी केंद्रे सुरू करता येतील का याबाबत कार्यवाही करावी, अशी सूचना राज्यमंत्री यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिली. ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता जयसिंगपूर पालिकेने पुढाकार घेऊन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारता येतील का यासाठी प्रयत्न करावेत, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी सुचविले यावर उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी अशा प्रकल्पांबाबत आम्ही माहिती घेतली असून यावरील खर्च मोठा असल्याने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून निधी उपलब्ध करून घेण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू असून निधीची उपलब्धता होताच आम्ही हे काम हाती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस डॉ. प्रसन्न कुंभोजकर, मुख्याधिकारी टीना गवळी, डॉ. सतीश पाटील, डॉ. अकलंक चौगुले उपस्थित होते.