प्रकाश पाटीलकोपार्डे : बालिंगा पूल धोकादायक असल्याचे कारण देत राष्ट्रीय महामार्ग विभागाने सोमवार (दि.२४)पासून पुलावरुन वाहतूक बंद केली आहे. साबळेवाडी फाटा व नागदेवडी फाटा येथे कडेकोट बंदोबस्त तैनात करून बॅरिकेट्स उभारून वाहतूक साबळेवाडी, खुपिरे, येवलुज, प्रयाग चिखली, आंबेवाडी मार्गे कोल्हापूरकडे वळवली आहे. यामुळे जनतेला मोठा त्रास होत असून या पुलावरील वाहतूक ताबडतोब सुरू करावी अशी मागणी माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. आज पालकमंत्र्यांचा कोल्हापूर दौरा असल्याने यावर जिल्हाधिकारी व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले आहे. नरके म्हणाले, जिल्ह्याच्या पश्चिम भागातील करवीर, पन्हाळा, गगनबावडा राधानगरी, शाहूवाडी या तालुक्यातील दीड दोनशे गावांना बालिंगा पुलावरून वाहतूक बंद केल्याने मोठी गैरसोय होत असून विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, रुग्ण यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. वरणगे पाडळी ते चिखली आंबेवाडी दरम्यान पुराचे पाणी कधीही रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. तशी परिस्थिती बालिंगा पुलावर नाही. यामुळे हा मार्गच लोकांच्या सोयीचा ठरणारा आहे.यामुळे बालिंगा पुलावरून किमान चार चाकी व दुचाकी वाहने सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी केली होती. आज पालकमंत्री दीपक केसरकर कोल्हापूर दौऱ्यावर येत असून परिस्थितीचा आढावा घेऊन मार्ग काढू असे आश्वासन दिल्याचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.
बालिंगा पूल वाहतुकीसाठी सुरु करा, माजी आमदार चंद्रदीप नरकेंनी पालकमंत्र्यांकडे केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 12:59 PM