सडोली (खालसा) : करवीर तालुक्याच्या पश्चिम भागाचा विकास व्हावा व तरुणांना रोजगार मिळावा यासाठी भोगावती रसायन खत कारखान्यास कवडीमोल दराने जमिनी दिल्या, परंतु गेल्या चाळीस वर्षांपासून हा प्रकल्प अपूर्ण अवस्थेत आहे. हा प्रकल्प सुरू करा, अन्यथा आमच्या जमिनी परत करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा वाशी, ता. करवीर येथील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चाळीस वर्षांपूर्वी माजी आमदार गोविंदराव कलिकते यांनी वाशी (ता. करवीर) गावच्या हद्दीत भोगावती सहकारी सूतगिरणीचा प्रकल्प सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यावेळी वाशी येथील जवळपास ४२ एकर जमिनीवर प्रकल्प निश्चित केला. १९८१-८२ पासून शेतकऱ्यांनी नाममात्र किंमत व घरातील एका व्यक्तीला नोकरी, अशा आश्वासनावर जमिनी दिल्या. पण गेल्या चाळीस वर्षांत या जमिनीवर प्रकल्प सुरू झाला नाही. परिणामी, सर्व शेतकरी व सभासदांची फसवणूक झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे गेल्या कित्येक वर्षात यापैकी एकही प्रकल्प पूर्ण होऊ शकला नाही. जमिनी देऊन आमचे खत झाले, परंतु अजूनही आमच्या मुलांना नोकरी दिली नाही, अशी खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली. प्रकल्प सुरू करा अन्यथा नाममात्र किमतीत घेतलेल्या आमच्या जमिनी परत करा, अशी मागणी सर्व शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदने देणार असून तिथे ठोस कार्यवाही न झाल्यास सर्व शेतकरी एकत्र येऊन प्रांताधिकारी, तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
फोटो: २५ वाशी शेतकरी
वाशी ता. करवीर येथील भोगावती रसायन खत प्रकल्प सुरू करा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.