कोल्हापूर : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या मोहरम सणानिमित्त आज, शनिवारी रात्री शहरातील प्रमुख तालीम संस्थांचे पीर पंजे भेटीला बाहेर पडले. पारंपरिक वाद्ये आणि आकर्षक लेसर किरणांमुळे पंजे भेट पाहण्यासाठी बिंदू चौक, शिवाजी चौक, भाऊसिंगजी रोड, गुजरी व महापालिका परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. मोहरमचा आज, शनिवारी सातवा दिवस होता. शहरातील मंगळवार पेठ, सोमवार पेठ, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, आदी परिसरातील पीर पंजे बाहेर पडले. घुडणपीर, बाबूजमाल, वाळव्याची स्वारी, बाराईमाम या ठिकाणी पंजे भेटीसाठी गेले. बाबूजमाल दर्ग्यातील नाल्या हैदर कलंदर पंजा रात्री साडेनऊच्या सुमारास भेटीसाठी बाहेर पडला. भवानी मंडप येथील वाळव्याची स्वारी, बाराइमाम, घुडणपीर याठिकाणी त्याने भेट दिली. मानाच्या दोन भव्य मशालींसह ‘कलंदर... कलंदर’ अशा जयघोष देत या पंजाने भेट दिली. यावेळी पंजाचे मानकरी सरदार जमादार, जयवंतराव जाधव-कसबेकर, जावेद सय्यद यांच्यासह बाबूजमाल तालमीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलबहार तालीम मंडळाचा पन्हाळगड स्वारी साधोबा हा पंजा रात्री आठच्या सुमारास बाहेर पडला. पंजासोबत मानाचा हुसेन घोडा, पाच सजविलेले उंट, झांजपथक, बॅँडचा लवाजमा यांचा यामध्ये सहभाग होता. शंभर वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा असणाऱ्या नाथागोळे तालमीचा ‘राजबक्ष’ (राजेबागस्वार)हा पीर पंजा आज राजेशाही थाटात भेटीसाठी बाहेर पडला. १९६८ मध्ये नाथागोळे तालमीचा पंजा भेटीसाठी पहिल्यांदा बाहेर पडला होता. त्यानंतर १९९७ मध्ये दुसऱ्यांदा व आज तिसऱ्यांदा राजेशाही थाटात ‘राजबक्ष’ पंजा सुमारे पंधरा वर्षांनंतर भेटीसाठी बाहेर पडला. यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, हलगी पथक, लेझीम पथक, घोडे अशा शाही थाटात पंजाने भेट दिली. लक्ष्मीपुरी येथील शिवशक्ती तरुण मंडळाचा हसन व हुसेन हे पंजे रात्री साडेआठच्या सुमारास पंचवीस वर्षांनी भेटीला बाहेर पडले. आकर्षक लेझर लाईट हे या भेटीचे आकर्षण होते. यामुळे पंजे पाहण्यासाठी बालगोपालांसह नागरिकांनी रस्त्यांवर गर्दी केली होती. पंजे भेटीच्या या मार्गावर पोलीस बंदोबस्त होता. रात्री उशिरापर्यंत पंजे भेट सुरू होती. (प्रतिनिधी)
पंजे भेटीला प्रारंभ
By admin | Published: November 02, 2014 12:36 AM