अमर मगदूम --- राशिवडे--‘भोगावती’ कारखान्याचा निवडणूक प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून, जाहीर सभांतून आरोप-प्रत्यारोपांची राळ उडाली. पण त्याचबरोबर वैयक्तिक गाठीभेटीतून थेट सभासदांपर्यंत पोहोचण्याचा सर्वच आघाड्यांचा प्रयत्न आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची असल्याने सर्व प्रकारच्या ‘जोडण्या’ही मोठ्या प्रमाणात लावल्या जात आहेत. यासाठी पै-पाहुणेही सक्रिय झाल्याने येथे प्रत्येक गटात टोकाचा संघर्ष पाहावयास मिळत आहे. महाआघाडी, शाहू आघाडी व परिवर्तन अशी तिरंगी लढत होत आहे. ‘भोगावती’च्या निवडणुकीत पहिल्यांदाच इतक्या ईर्ष्येने निवडणूक होत असल्याने सत्तेचा लंबक कोणाच्या बाजूने झुकेल याचा थांगपत्ताही लागत नाही. गेले आठ-दहा दिवस प्रचारसभांनी परिसरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असताना ‘भोगावती’च्या राजकारणामुळे कार्यक्षेत्रातील तापमानात आणखी वाढ झाल्याचे चित्र आहे. रखरखत्या उन्हातही प्रचाराच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. शेवटच्या टप्प्यात व्यक्तिगत गाठीभेटी घेण्यावर सर्वच उमेदवारांनी भर दिला असून, सकाळी सहा वाजल्यापासूनच मतदारांच्या दारात उमेदवार व समर्थक जाताना दिसत आहेत. सकाळी व सायंकाळी महिला हळदी-कुंकूच्या माध्यमातून प्रचारात उतरल्या आहेत. गावातील प्रत्येक गटाचे ‘कारभारी’ रात्री उशिरापर्यंत प्रचारमोहीम राबविताना दिसत आहेत. प्रत्येक गावात सकाळी व सायंकाळी पारावरील गप्पाही चांगल्याच रंगताना दिसत आहेत. (वार्ताहर)गावोगावचे वातावरण तापले!भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीला मर्यादित सभासद असल्याने सामान्य माणसांशी फारसा संबंध येत नाही; पण ‘भोगावती’च्या प्रचाराने गावा-गावांतील वातावरण चांगलेच तापले आहे. ग्रामपंचायतीसारखी प्रचार यंत्रणा राबविली जात असल्याने रंगत आली आहे.आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला निवडणुकीत पहिल्यादांच कार्यक्षेत्राबाहेर नेते उतरले आहेत. आमदार सतेज पाटील, आमदार सुरेश हाळवणकर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह माजी आमदार पी. एन. पाटील, संपतराव पवार, के. पी. पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
वैयक्तिक गाठीभेटीसह ‘जोडण्या’ सुरू
By admin | Published: April 21, 2017 12:05 AM