सेनापती कापशी : कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गावोगावी कोरोना रुग्ण सापडू लागले आहेत. लोकांच्या मनामध्ये प्रवासाची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरण केंद्रे गावोगावी सुरू करावीत, अशी मागणी आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त कर्नल शिवाजी बाबर यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे केली आहे.
जैन्याळ (ता. कागल) येथे कोरोना लसीकरण प्रारंभसंगी ते बोलत होते. यावेळी सरपंच हौसाबाई बरकाळे, उपसरपंच लीलाबाई देवबा गुरव, संजय बरकाळे, हिंदुराव डावरे, विष्णुपंत इंगवले, अशोक जाधव, पांडुरंग जाधव, आदी उपस्थित होते.
कोरोनाची लस ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर घेणे गरजेचे आहे. या लसीकरणामुळे कोरोनाची दुसरी लाट थोपविणे शक्य आहे. याकरिता गावपातळीवर आजी-माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. जास्तीत जास्त जास्त ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर घेऊन जावे. या राष्ट्रीय आपत्तीत सर्वांनी एकजूट होऊन लढा देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन बाबर यांनी केले.
प्रवासामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे, या भीतीपोटी ज्येष्ठ नागरिक लसीकरण केंद्रात जाण्यासाठी घाबरत आहेत. याकरिता जिल्हा प्रशासनाने गावोगावी कोरोना लसीकरण केंद्रे सुरू करावीत. जेणेकरून ज्येष्ठ व वयोवृद्ध नागरिकांना गावातील लसीकरण केंद्रावर लस घेणे शक्य होईल. असे केल्यास लोक आपोआप लस घेण्यासाठी पुढे येतील, असेही बाबर यावेळी म्हणाले. हिंदुराव डावरे यांनी मनोगत व्यक्त केले.