कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची सध्याची दिलासादायक परिस्थिती पाहता कोरोनाव्यतिरिक्त नॉन कोविड रुग्णांची परवड थांबविण्यासाठी सीपीआर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, अशी सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शनिवारी सीपीआर प्रशासनाला केली. क्षीरसागर यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
गेले सहा महिने कोरोनाबाधित रुग्णांवर लक्ष केंद्रित केल्याने कोरोनाव्यतिरिक्त इतर रुग्णांच्या उपचारावर विपरीत परिणाम होताना दिसून आला. कोरोनामुळे शासकीय व खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आली. त्यामुळे नियमित आजाराच्या रुग्णांची उपचाराअभावी कोंडी होत आहे. बहतांश छोटे खासगी दवाखाने बंद आहेत. सीपीआर रुग्णालय कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यातील आणि कर्नाटकातूनही येणाऱ्या रुग्णांसाठी वरदायिनी आहे. या ठिकाणी दररोज हजारो गोरगरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. परंतु, सीपीआर रुग्णालय पूर्णपणे कोरोनासाठी राखीव ठेवले गेल्याने येथे होणाऱ्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी रुग्णालयात पाठवले जात असल्याकडे क्षीरसागर यांनी लक्ष वेधले.
सी. पी. आर.चा सर्व भार कसबा बावडा सेवा रुग्णालयावर पडला असून तेथेही सेवा रुग्णालयात फक्त ४३ बेड आहेत. तसेच डॉक्टर व स्टाफ कमी आहे. म्हणूनच सीपीआर रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे. मेडिसिन बाह्य रुग्ण विभागसह कान, नाक, घसा विकार, स्त्री रोग, अस्थीरोग, डोळ्यांचे विकार, बालरोग, शस्त्रक्रिया विभाग तातडीने सुरू करावेत, असे त्यांनी सांगितले.
यावेळी शहरप्रमुख रविकिरण इंगवले, किशोर घाडगे, जयवंत हारुगले, कृपालसिंह रजपूत, सुनील करंबे, तुकाराम साळोखे, सुनील जाधव, रवि चौगुले उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०५१२२०२०-कोल-सीपीआर मिटींग
ओळ - कोल्हापुरातील नॉन कोविड रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू करावेत, या मागणीच्या अनुषंगाने राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याशी चर्चा केली.