लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : किल्ले रायगड विकास आराखड्यानुसार येत्या पंधरा दिवसांत संवर्धनाचे काम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटनमंत्री जयप्रकाश रावल यांनी केली. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात रायगड संवर्धनाबाबतची पहिली आढावा बैठक झाली. बैठकीत महाराष्ट्रातील दुर्गप्रेमींच्याकडून खासदार संभाजीराजे यांनी त्यांच्याकडे रायगडसंदर्भात आलेल्या लेखी काही सूचनाही पुरातत्त्वच्या अधिकाऱ्यांकडे दिल्या. त्यानुसार रायगड किल्ल्यांची दुरुस्ती आराखडे तयार करण्यात आले आहेत. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रायगडवरील ‘राजसदरे’च्या डागडुजीपासून या कामांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या किल्ल्यावर असणाऱ्या पुरातन पाण्याच्या हौदातील गाळ काढण्यात येणार आहे. या गाळमुक्त होणाऱ्या हौदातील पाण्याचा उपयोग रायगडावरील येत्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी उपस्थित होणाऱ्या दुर्गप्रेमींसाठी होणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी सांगितले.याशिवाय किल्ल्यावर लाईट, साऊंड शो, किल्ल्यावर येणाऱ्या दुर्गप्रेमींच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय ‘डीआरडीओ’ संस्थेमार्फत करण्यात येणार आहे. किल्ल्यावरच वृक्षारोपण केल्यानंतर त्याला लागणाऱ्या पाण्यासाठीही स्वतंत्र निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. या किल्ल्यावर संवर्धनाचे काम किमान अडीच ते तीन वर्षे चालणार असल्याने तेथे कायमस्वरूपी शासनाचा स्वतंत्र विभाग उभारण्यात येणार आहे तेथे अधिकारी राहून ते कामावर देखरेख ठेवतील, अशीही माहिती बैठकीत देण्यात आली. गडावर नियमित स्वच्छता राखावी, तसेच पर्यटकांना स्वच्छतेबाबत मार्गदर्शन करावे, अशा वेगवेगळ्या सूचना त्यांनी बैठकीत मांडल्या. अपुऱ्या वेळेअभावी घाईगडबडीत विकासकामे उरकून न होता तो निधी पुन्हा वर्ग करावा, यासाठी पीएलए (पर्सनल लेजर अकौंट)चीतरतूद करण्यात यावी, अशाही सूचना आढावा बैठकीत मांडण्यात आल्या. रायगडावर पुरातत्व खात्याने सुरू केलेली विकासकामे योग्य पद्धतीने व्हावीत तसेच किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व जपून त्याचा विकास व्हावा यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सूचना मांडल्या.या बैठकीस, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, एम. नबीराजन, भारतीय पुरातत्त्व विभागाचे संचालक राकेश तिवारी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सह.व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, आर. एस. मोहिते, एम.टी.डी.सी.चे शैलेश बोरसे, राहुल सामले आदी उपस्थित होते.५०६ कोटींचा निधीरायगडाच्या संवर्धनासाठी शासनाच्यावतीने ५०६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यापैकी सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी हा महाड ते रायगड या महामार्गासाठी वापरण्यात येणार आहे, तर या किल्ल्यावर संवर्धन आणि उत्खनन महत्त्वाचे असल्याने त्यासाठी सुमारे १२० कोटींचा निधी खर्च करण्यात येणार आहे. या दुरुस्ती आराखड्याचे काम किमान अडीच ते तीन वर्षे चालणार आहे. त्यासाठी रायगडावरच स्पेशल सेल (कायमस्वरूपी स्वतंत्र विभाग) उभारण्यात येणार आहे.
रायगडच्या संवर्धनाला पंधरा दिवसांत प्रारंभ
By admin | Published: May 12, 2017 1:25 AM