कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या मार्च-एप्रिल दरम्यान परीक्षेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया आज, सोमवारपासून सुरू होणार आहे. आॅनलाईन प्रक्रिया असून त्यासाठी विनाविलंब शुल्कासह दि. १८ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे.
या केंद्रामार्फत सन २०१९-२०२० मध्ये बी. ए., बी. कॉम., एम.ए., एम. कॉम., एम. एस्सी (गणित), एमबीए, एम. कॉम. (व्हॅल्युएशन आॅफ रिअल इस्टेट) या अभ्यासक्रमांच्या परीक्षार्थींच्या आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेल्या परीक्षांचे गुणपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. आता मार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेचा सोमवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यात विनाविलंब शुल्कासह दि. १८ फेब्रुवारी, तर विलंब शुल्कासह दि. १९ ते २४ फेब्रुवारी आणि अतिविलंब शुल्कासह दि. २५ ते २९ फेब्रुवारीपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थी, विद्यार्थिनींनी दूरशिक्षण केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे यांनी केले आहे.