कोल्हापूर : अनुकंपा सेवा भरती विनाअट करावी, चतुर्थश्रेणी कर्मचारीवर्ग सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या एका पाल्यास शासन सेवेत सामावून घ्यावे, यासह विविध मागण्यांसाठी सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी गुरुवार व शुक्रवारी असे दोन दिवस संपावर गेले आहेत.
कोल्हापुरात गुरुवारी स्थानिक सुटी असल्याने संपाचा परिणाम जाणवला नाही, मात्र शुक्रवारी याची तीव्रता जाणवणार आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार कर्मचाºयांनी यावेळी व्यक्त केला.
संघटनेतर्फे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. १४ मार्च २०१७ रोजी झालेल्या बैठकीत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु अद्याप एकही मागणी शासनाने मान्य केलेली नाही. त्यामुळे कर्मचाºयांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.
या संपात पहिल्या दिवशी जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक कर्मचारी सहभागी झाले. सकाळी १० वाजता सर्व कर्मचारी टाऊन हॉल उद्यान येथे जमले. यावेळी झालेल्या सभेत सरकारने मागण्या मान्य न केल्यास बुधवारपासून ‘बेमुदत संपा’वर जाण्याचा निर्धार कर्मचाºयांनी व्यक्त केला. शुक्रवारी सकाळी १० वाजता पुन्हा टाऊन हॉल येथे एकत्र येऊन संप यशस्वी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
राज्य सरकारी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश भोसले म्हणाले, कंत्राटी कर्मचाºयांना मंजूर असलेल्या मानधनाऐवजी प्रत्यक्ष हातात पडणाºया मानधनामध्ये खूप तफावत आहे. या मानधनामध्ये कर्मचाºयांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह चालणे अत्यंत जिकीरीचे होऊन बसले आहे. त्यांना कायम नोकरीमध्ये सामावून घेऊन विविध विभागांत असणाºया चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांची रिक्त पदे लवकर भरावीत.
राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष वसंत डावरे म्हणाले, चतुर्थश्रेणी कर्मचाºयांची संख्येच्या तुलनेत विविध विभागांत असलेली रिक्त पदे यामुळे सध्या असलेल्या कर्मचाºयांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे त्यांचे शारीरिक हालही होत आहेत.
माजी अध्यक्ष संजय क्षीरसागर म्हणाले, गेली अनेक वर्षे चतुर्थश्रेणी कर्मचारी न्याय व हक्कांच्या मागण्यांकरीता सरकारकडे पाठपुरावा करत आहे; परंतु अद्याप त्यांना न्याय मिळालेला नाही. जिल्हा संघटक जयसिंग जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
आंदोलनात कृष्णा नाईक, गणेश आसगांवकर, विश्वास पाटील, राजेश वालेकर, राणी घावरी, वैजयंता कांबळे, बाळासाहेब कवाळे, मौला मुल्ला आदी सहभागी झाले होते.
या विभागांचा सहभाग अन् पाठिंबा
या संपात छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), महसूल, शिक्षण, आयटीआय, सार्वजनिक बांधकाम विभाग, तंत्रशिक्षण विभाग, कोषागार कार्यालय, विक्रीकर, आरोग्य, वैद्यकीय शिक्षण आदी विभागांतील शिपाई, सफाई कामगार, वॉर्डबॉय, चपरासी, चौकीदार, मुकादम, मजूर असे जवळपास एक हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी सहभागी झाले. त्याचबरोबर या संपाला नर्सिंग फेडरेशन, लिपिक वर्गीय संघटना, वाहतूक संघटना, महाराष्टÑ गव्हर्न्मेंट नर्सेस संघटना, महसूल कर्मचारी संघटना आदींनी या संपाला पाठिंबा दिला.