कोल्हापूर : बीबीए, बीसीएस, एमबीए अभ्यासक्रम शिकणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांना फ्री शिप व स्कॉलरशिप सुरू करा, अशी मागणी ओबीसी जनमोर्चा पुरस्कृत ओबीसी सेवा फाउंडेशनच्या वतीने सोमवारी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली.व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या बहूजन कल्याण विभागामार्फत ओबीसी, भटके विमुक्त, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फ्री शिप, आणि स्कॉलरशिप दिली जाते. परंतु महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या बीबीए, बीसीएस, एमबीए या सारख्या व्यावसायिक अभ्यासक्रम शासनाने विनाअनुदान तत्त्वावर चालविण्यास महाविद्यालयांना परवानगी दिली आहे.हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १०० टक्के फ्री शिप शासन देत आहे. त्याच धर्तीवर ओबीसी प्रवर्गातील हे अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शासनाने फ्री शिप, स्कॉलर\शिप सुरू करावी.
ह्या मागणीचे निवेदन उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे वतीने आयोजित तक्रार निवारण मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांना देण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य दिगंबर लोहार, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, पी. ए. कुंभार, सचिन सुतार, सुखदेव सुतार उपस्थित होते.