रत्नागिरी : मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरविद्यापीठीय पश्चिम विभागीय महिला कबड्डी स्पर्धेला महाविद्यालयाच्या जवाहर क्रीडांगणावर रविवारी प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशाच्या पाच राज्यांतील ४० विद्यापीठांतील ४८० विद्यार्थी व त्यांचे प्रशिक्षक सहभागी झाले आहेत.यावेळी उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे बी. सी. यु. डी. संचालक डॉ. अनिल पाटील, प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम केंद्रे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे, सहकार्यवाह नाना पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर, विद्यार्थी प्रतिनिधी केवल मलुष्टे उपस्थित होते.खेळाडूंना मार्गदर्शन करताना डॉ. अनिल पाटील म्हणाले की, हे महाविद्यालय विद्यापीठातील सक्षम महाविद्यालय असून, उच्च गुणवत्ता धारण करणारे असल्यानेच त्यांना स्पर्धा आयोजनाची जबाबदारी देण्यात आली. पाच राज्यांतून आलेल्या खेळाडूंना त्यांनी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे क्रीडा संचालक आणि संयोजन समितीचे सचिव डॉ. विनोद शिंंदे यांनी स्वागत केले. संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. विलास पाटणे यांच्या हस्ते डॉ. अनिल पाटील यांचा सत्कार करण्यात आला. नाना पाटील यांनी डॉ. उत्तम केंद्रे यांचा सत्कार केला. विद्यापीठ उपकेंद्राचे समन्वयक डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांचा प्राचार्यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. टिळक, सावरकर, आंबेडकर यांच्या जन्मभूमीत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे अॅड. विलास पाटणे यांनी स्वागत केले. ही भूमी पर्यटनस्थळ असून, इथला अथांग सागर इथल्या मानवी मनाची प्रचिती देतो, अशा प्रदेशात स्पर्धकांनी स्पर्धांचा आनंद लुटावा, स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. उत्तम केंद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या समारंभाकरिता राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ. बी. एस्. बिडवे, श्रीमान भागोजीशेठ कीर विधी महाविद्यालयाचे प्राचार्य अॅड. राजशेखर मलुष्टे, भूतपूर्व क्रीडा संचालक मदन भास्करे, विज्ञान विभागाचे अरविंद कुलकर्णी उपस्थित होते. उपप्राचार्या डॉ. चित्रा गोस्वामी यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)४० विद्यापीठातील ४८० विद्यार्थी व प्रशिक्षक सहभागी.मुंबई विद्यापीठ आणि गोगटे - जोगळेकर महाविद्यालयातर्फे आयोजन.स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटावा : विलास पाटणे.विविध मान्यवरांचा उद्घाटनप्रसंगी करण्यात आला सत्कार.
आंतरविद्यापीठीय कबड्डी स्पर्धेला प्रारंभ
By admin | Published: December 06, 2015 11:04 PM