कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतील भाविकांचे कुलदैवत, ‘दख्खनचा राजा’ जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेस रविवारी जोतिबा डोंगरावर (वाडी रत्नागिरी) येथे कामदा एकादशीनिमित्त प्रारंभ झाला. ‘चांगभलं’च्या गजरात, गुुलालाची उधळण करत भाविक जोतिबा डोंगराकडे रवाना होत आहेत. गुरुवारी, चैत्र पौणिमेदिवशी यात्रेचा मुख्य दिवस आहे. रविवारी जोतिबा डोंगरावर जाण्यापूर्वी कोल्हापुरात पंचगंगा नदीवर स्नान करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. या चैत्र यात्रेसाठी जोतिबा डोंगरावर सुमारे सात लाखांहून अधिक भाविक जोतिबाचे दर्शन घेतात. प्रशासनाने या यात्रेसाठी जय्यत तयारी केली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीघाटावर एस. टी. महामंडळाने निवारा शेड उभारले आहे. मंगळवारपासून पंचगंगा घाटावरून भाविकांसाठी एस. टी. बसेसची विशेष सोय केली आहे, तसेच मध्यवर्ती बसस्थानक, जोतिबा बसस्थानकातून पाच मिनिटाला बसेस सुटणार आहे. यात्रेला रविवारी प्रारंभ झाल्याने पंचगंगा घाटावर स्नानासाठी भाविकांची दिवसभर गर्दी होती. परगावातून आलेल्या खासगी वाहनांचे ताफे येथे उभे होते. ‘चांगभलं’च्या गजरात सासनकाठ्या, भगवे झेंडे घेऊन भाविक खासगी वाहनांतून येत होते. स्नान करून पुन्हा ते जोतिबा डोंगराकडे पायी, खासगी वाहनांतून जात होते. कोल्हापूर-पन्हाळा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती.पंचगंगा घाटावर स्नानाची परंपराजोतिबा डोंगरावर देवदर्शन करण्यासाठी जाण्यापूर्वी कोल्हापुरात पंचगंगा घाटावर भाविकांनी स्नान करून देवाऱ्याचे टाकचे पूजन करून डोंगरावर जाण्याची प्रथा गेले अनेक वर्षांपासून सुरू आहे. रविवारी दिवसभर पंचगंगा नदीघाटावर स्नान करण्यासाठी तसेच देवाचे टाक पूजन करण्यासाठी भाविकांची गर्दी दिसत होती. बेळगावची मानाची सासनकाठी दाखल‘चांगभलं’चा गजर : सोलापूरपासून उद्धव कोरे यांचा दंडवतजोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर रविवारी बेळगावची मानाची सासनकाठी चांदीची मूर्ती, नंदीकाठीच्या लवाजम्यासह दाखल झाली. सोलापूर ते जोतिबा डोंगर पायी दंडवत घालत आलेल्या उद्धव कोरे या भाविकाचे आगमन जोतिबा मंदिरात झाले.श्री क्षेत्र जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेसाठी मानाच्या सासनकाठ्या येण्यास प्रारंभ झाला आहे. रविवारी कामदा एकादशीच्या मुहूर्तावर बेळगावातील चव्हाट व नार्वेकर गल्लीतील ईराप्पादादा यांची सासनकाठी, नंदी व जोतिबा देवाच्या चांदीच्या मूर्तीचे जोतिबा मंदिरात वाजतगाजत आगमन झाले. सुवासिनींनी सासनकाठीवर पाणी घालून औक्षण केले. बुधवारी सासनकाठी मिरवणुकीतील मानाच्या सासनकाठ्या दाखल होतील. .सोलापूरपासून दंडवत घालत आलेल्या उद्धव मलकाप्पा कोरे या भाविकाचे रविवारी जोतिबा मंदिरात आगमन झाले. पुजारी अजित व संदीप भिवदर्णे यांनी त्यांचे पानाचा विडा देऊन स्वागत केले. कोरे यांनी १५ मार्चला सोलापुरातील कळमणपासून दंडवत घालण्यास सुरुवात केली. मोहोळ तालुका, पंढरपूर, सांगोला, मिरज, सांगली, हातकणंगले, हेर्ले, शिये, जठारवाडी, कुशिरे, पोहाळेमार्गे त्यांनी प्रवास पूर्ण केला. पाणी वाचवा अभियानकोल्हापूर जिल्हा टू-व्हिलर मॅकेनिक असोसिएशनची बैठक रविवारी झाली. त्यात कोल्हापूर ते जोतिबा ते वारणा या मार्गावर नऊ ठिकाणी टू-व्हिलर दुरुस्ती, पंक्चर मॅकेनिकल अशा ७० जणांच्या पथकाची सोय केली आहे. त्यातून मोफत सेवा देण्यात येणार आहे. याशिवाय याच पथकामार्फत ‘पाणी वाचवा’ अभियान राबविण्यात येणार असून तहानलेल्या भाविकांसाठी मार्गावरच पिण्यासाठी पिण्याच्या बाटल्या पुरविण्यात येणार आहेत.
‘जोतिबा’च्या चैत्र यात्रेस प्रारंभ
By admin | Published: April 18, 2016 12:48 AM