आयुब मुल्ला - खोची -स्थानिक स्थराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची चाचपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सुरू केली आहे. गतवेळी आयत्यावेळी त्यांनी न लढण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याने त्यांनी त्यादृष्टीने आपली व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.काँग्रेसकडून आमदार महादेवराव महाडिक यांच्या नावाचा विचार करायचा की नाही यासंदर्भात बोलताना जिल्ह्याचे काँग्रेसचे महापालिका निवडणूक निरीक्षक पतंगराव कदम यांनी नकारात्मक संदेशाचे सूचन केले आहे. त्यामुळे त्याठिकाणी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तरीसुद्धा काँग्रेसच्या बाबतीत कोणाला उमेदवारी द्यायची याचे चित्र स्पष्ट नाही.राष्ट्रवादीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला, तर राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचेच नाव आघाडीवर आहे. कारण पक्षाकडे तुल्यबळ लढत देणारा अशी त्यांची प्रतिमा आहे. त्यांचे कोणत्याही पक्षातील कार्यकर्त्यांबरोबर व्यापक अर्थाने शत्रुत्व नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हे दिसून आले आहे. त्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवून काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मदतही मिळविली व मताधिक्क्याने विजयी झाले. ‘गोकुळ’मध्येही सतेज पाटील यांना सहकार्याचा हात दिला. हा झाला त्यांच्या तालुक्यातील राजकीय ताकदीचा भाग; परंतु त्यांना ही ताकद आणि जिल्ह्यातील इतरांना केलेली मदत पाहता विधान परिषद रणांगण आता खुणवू लागले आहे.शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत चार नगरपालिका, जिल्हा परिषद सदस्य संख्या यांचे पाठबळ विजयासाठी महत्त्वाचे आहे. तेथेच बेरीज होईल, असा त्यांचा अंदाज आहे. जयसिंगपूर नगरपालिकेवर त्यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. त्यांना मानणारे या नगरपालिकेत १९, तर कुरुंदवाड नगरपालिकेत सहा सदस्य आहेत, तर जिल्हा परिषदेचे दोन सदस्य आहेत. यांची बेरीज २७ होते. इचलकरंजी नगरपालिकेतही त्यांना सहकार्य करतील, अशी चांगली संख्या आहे.कोल्हापूर महापालिकेत राष्ट्रवादीने गतवेळेसारखी संख्या प्राप्त केली, तर त्यांची आशा अधिक पल्लवित होणार आहे. सगळ्या हालचाली त्यांनी सावधपणे सुरू ठेवल्या आहेत. विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांच्याबरोबर त्यांचे वैरत्व नाही; परंतु काँग्रेसअंतर्गत वैरत्वाचा फायदा-तोटा महाडिकांना होऊ शकतो. जर सतेज पाटील यांनीही लढण्याचा निर्णय घेतला, तर तिरंगी लढतसुद्धा होऊ शकते. जर सतेज पाटील यांनी किंवा काँग्रेसचा अन्य कोणी उमेदवारच नसेल व त्यांचे समर्थन मिळणार असेल तर त्यांचा निर्णय धाडसी होऊ शकतो. हेच धाडस ते प्रसंगावधान राखून करणार असे चित्र आहे.जयसिंगपूर पालिकेवर यड्रावकर यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. त्यांना मानणारे या नगरपालिकेत १९, तर कुरुंदवाड नगरपालिकेत सहा सदस्य आहेत, तर जिल्हा परिषदेचे दोन सदस्य आहेत. यांची बेरीज २७ होते.दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे रिंगणात उतरणार असल्याने दावेदारी.
विधान परिषदेसाठी जुळवाजुळव सुरू
By admin | Published: October 09, 2015 9:57 PM