कोल्हापूर : ऐतिहासिक बिंदू चौकातून सकल हिंदू समाजाचा लव जिहाद विरोधात हिंदू आक्रोश मोर्चास रविवारी प्रारंभ झाला. सकाळी दहा वाजता बिंदू चौकात जमलेल्या कार्यकर्त्यांनी विविध घोषणा दिल्या. महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून उपस्थित हिंदुत्ववादी नेत्यांच्या हस्ते पुष्पहार घालण्यात आले. यावेळी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यानंतर मंत्पुष्पांजलीने भगव्या ध्वजाचे पूजन करण्यात आले. बिंदू चौकातील हनुमानाच्या मंदिरापासून या मोर्चास प्रारंभ झाला. यात अग्रभागी ध्वज, त्यापाठोपाठ महिला आणि त्यामागे जमलेले कार्यकर्ते सहभागी झाले.
हा मोर्चा बिंदू चौकातून जुन्या देवल क्लब, मिरजकर तिकटी, महाद्वार रोड, पापाची तिकटी, छत्रपती शिवाजी महाराज चौक निघून भवानी मंडप येथे त्याची सांगता झाली. मोर्चा मार्गात ठिकठिकाणी भगवे झेंडे, टोप्या, उपरणे, कपाळाला लावण्यात आलेल्या पट्या, अष्टगंध वाटले जात होते. या मोर्चात विविध हिंदुत्ववादी संघटना सहभागी झाल्या होत्या.
दिल्ली येथील सुदर्शन चॅनलचे संस्थापक सुरेश चव्हाणके, खासदार धनंजय महाडिक, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, महेश जाधव, वकील सुधीर जोशी वंदुरकर, शांतिनाथ लिंबानी, अनिरुद्ध कोल्हापुरे, केशव गोवेकर, शिवानंद स्वामी, विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी यांच्यासह विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. मोर्चा मार्गावर थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उपवासाचे लाडू यांचे वाटप करण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला होता.