लोकमत न्यूज नेटवर्क
गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यासाठी गडहिंग्लज येथे ५०० ऑक्सिजन सिलिंडरचा डेपो सुरू करावा, अशी मागणी उपनगराध्यक्ष महेश कोरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांना हे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी मोहन भैसकर, गुरूनाथ मोरे, विश्वनाथ रायकर उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे, वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन उपजिल्हा रूग्णालय हे कोविडसाठी समर्पित करण्यात आले आहे. त्याशिवाय तीनही तालुक्यांत अनेक खासगी कोविड सेंटर्स सुरू झाली आहेत. परंतु. त्यांना पुरेसे ऑक्सिजन सिलिंडर्स वेळेवर उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रूग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
जुलै-ऑगस्टमधील संभाव्य तिसरी लाट आणि सध्याची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने गडहिंग्लजला ऑक्सिजन डेपो सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.