टीका-टिप्पणी टाळा, विकासावर बोला; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अजित पवार यांचा सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 03:50 PM2024-08-12T15:50:04+5:302024-08-12T15:50:35+5:30
विरोधकांनी तयार केलेली प्रतिमा खोडून काढून तयारीला लागा
कोल्हापूर : मागे काय झाले? हे उकरत बसू नका. कोणी आरोप केले तरी पदाधिकाऱ्यांनी टीका-टिप्पणी टाळून विकास व योजनांवर बोलावे, असा सल्ला देत लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी संविधान बदलणार म्हणून सरकारची प्रतिमा खराब केली होती; ती खाेडून काढून विधानसभेला सामोरे जा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बूथ समन्वयक व पदाधिकाऱ्यांच्या रविवारी कोल्हापुरात आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ होते. लोकसभा निवडणुकीत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा फटका पक्षाला बसला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वडीलधाऱ्यांचा अपमान होईल, असे बोलू नका, अशा शब्दांत अजित पवार यांनी महिला जिल्हाध्यक्ष शीतल फराकटे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना दम दिला.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, राज्य सरकारने गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना सुरू केल्या असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या घराघरापर्यंत पोहोचवाव्यात. लोकप्रिय योजनांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला असून दहा वेळेला राज्याचा अर्थसंकल्प आपण मांडल्याने पैशांची जोडणी कशी लावायची, हे चांगले माहीत आहे. विधानसभेला महायुतीबरोबर एकोप्याने काम करा. आपली खरी कसोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आहे. आतापासूनच चांगली मशागत करा, पीक कोणते घ्यायचे हे त्यावेळी सांगू.
पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, विधानसभेला चार जागा घ्या. त्या सर्व निवडून आणण्याची शपथ घेतो. अजितदादांचा बदललेला लुक येणाऱ्या विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी प्रास्ताविक केले. शीतल फराकटे, आदिल फरास, आमदार राजेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मानसिंगराव गायकवाड, युवराज पाटील, भैया माने, प्रा. किसन चौगले, अनिल साळोखे, नितीन दिंडे, असिफ फरास, विकास पाटील-कुरुकलीकर, मधुकर जांभळे, संतोष पाटील, शिवाजी देसाई, आदी उपस्थित होते.
सरकार २४ तास जागे
सरकार २४ तास जागे राहून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री पहाटे चारपर्यंत काम करतात आणि आपण तेथून पुढे रात्री उशिरापर्यंत काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
मुश्रीफ हेच खरे श्रावणबाळ
हसन मुश्रीफ यांनी तीनशेहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करून आणले. त्यांचे हे काम खरोखरच मोठे असून, ते गोरगरिबांचे खरे श्रावणबाळ असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री पवार यांनी काढले.
१७ ऑगस्टला बहिणींच्या खात्यात ओवाळणी
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेंतर्गत बहिणींच्या खात्यात १७ ऑगस्टला प्रत्येकी तीन हजार रुपयांची ओवाळणी पाेहोच होईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
पक्षाचे कार्यक्षेत्र ‘कागल’च्या बाहेर वाढवा
‘कागल’, ’चंदगड’ पुरता पक्ष ठेवू नका, त्याच्याबाहेर कार्यक्षेत्र वाढवा. अनेक वर्षे पालकमंत्री पद मिळाले नव्हते. आता हसन मुश्रीफ आहेत. त्यामुळे पक्ष मजबूत करून ‘दोन्ही खासदार देणारा जिल्हा’ हे दिवस पुन्हा आणा, असे आवाहन पवार यांनी केले.
सत्काराने पवार भारावले
जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी उपमुख्यमंत्री पवार यांचा सत्कार उसाची मोळी, काठी आणि घोंगडे, घुळाची ढेप देऊन केल्यानंतर ते भारावले होते.