जयसिंगपूर : कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासिकांच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी संपल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुरू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासिकांच्या प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी संपल्यानंतर महाविद्यालयीन प्रवेश फेरीद्वारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना व डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना शिष्यवृत्ती देण्यात येत होती. मात्र, राज्य सरकारने नुकतेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ पासून चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्न व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेची अंतिम फेरी संपल्यानंतर शिष्यवृत्ती बंद करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. तसेच राज्य शासनाने पुन्हा लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सर्वसामान्य शेतकरी, कामगार तसेच लहान व्यापाऱ्यांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची बनलेली आहे. शिष्यवृत्ती बंद करून शासनाने विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. त्यामुळे ही शिष्यवृत्तीची योजना त्वरित सुरू करावी, अशी मागणी शेट्टी यांनी निवेदनात केली आहे.